आंगणेवाडीसाठी १५0 जादा गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2016 11:59 PM2016-02-22T23:59:23+5:302016-02-22T23:59:23+5:30
भराडीदेवी यात्रेसाठी एस.टी. सज्ज : फिरते दुरूस्ती पथक कार्यरत, विभाग नियंत्रकांची माहिती
कणकवली : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीच्या यात्रोत्सवासाठी एस. टी. प्रशासन सज्ज झाले आहे. कणकवली, मालवण व कुडाळसह अन्य तालुक्यातून विविध ठिकाणांहून भाविकांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. या यात्रेसाठी एस.टी.च्या सिंधुदुर्ग विभागातून १५० गाड्यांचा ताफा जादा वाहतुकीसाठी सज्ज ठेवण्यात आला आहे.
सावंतवाडी, वेंगुर्ले, देवगड, विजयदुर्ग या आगारांच्या कार्यकक्षेतील परिसरातूनही प्रवासी उपलब्धतेनुसार एस.टी.च्या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. २५ फेब्रुवारी रोजी पहाटेपासूनच या गाड्यांची सोय उपलब्ध करण्यात आली असून २६ फेब्रुवारीपर्यंत ही सेवा सुरु राहणार आहे. २४ फेब्रुवारी रोजी प्रवाशांचा ओघ पाहून जादा गाड्यांची सोय करण्यात येणार आहे.
आंगणेवाडी येथे भाविकांच्या सोयीसाठी प्रवाशी शेड व ३ वाहतूक केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये मालवण विभागासाठी केेंद्र क्रमांक १, कणकवली व कुडाळसाठी केंद्र क्रमांक २ तर मसुरे विभागाकरीता केंद्र क्रमांक ३ ची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना एस. टी. मध्ये सुलभ प्रवेश मिळावा यासाठी ‘क्यू’ रेलिंगची सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे.
या वाहतूक केंद्रांवर दूरध्वनी, पिण्याचे पाणी, फिरती मुतारी, विजेची सोय, ध्वनीक्षेपक, डिझेल, फिरते दुरुस्तीपथक, क्रेन तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून फिरते गस्त पथकही तैनात राहणार आहे. नियंत्रण केंद्रांवर अधिकारी, पर्यवेक्षकीय कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी यांचा ताफा अहोरात्र उपलब्ध राहणार आहे.
आंगणेवाडी येथे जाण्यासाठी एस.टी.च्या विविध आगारातून सोडण्यात येणाऱ्या गाड्यांबरोबरच जादा गाड्यांची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये कणकवली-सावंतवाडी ४ गाड्या, स्थानिक पातळीवरून आंगणेवाडीकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये घोटगे २ गाड्या, कडावल १, पणदूर सिंधुदुर्गनगरी ते आंगणेवाडी ३, पाट परुळेवरून ३, कट्टा कुणकवण १, कट्टा गुरामवाडी १, खरारे-मोगरणे २, कुडाळ निरुखे पांग्रडमार्गे ११, तिरवडेवरून १, कसाल हिवाळेवरून ४, कसाल खोटलेवरून ४ गाड्या तैनात ठेवण्यात येणार आहेत. हुबळीचा माळ ते आंगणेवाडी १, मालवणवरून १५ गाड्या, टोपीवाला हायस्कूल ते आंगणेवाडीपर्यंत ३ गाड्या ठेवण्यात आल्या असून या गाड्या सातत्याने फेऱ्या मारणार आहेत. देवबाग-तारकर्लीवरून ४, आनंदव्हाळवरून १, डांगमोडे १, सर्जेकोट १, मालवण १ अशा गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गाड्यांच्या माध्यमातून भाविकांची ने-आण करण्यात येणार आहे. मसुरेवरून ६, पोईपवरून १, चौके-देवली १, देवली-वायरी १, वराड १, सुकळवाड-तळगाव १, बांदिवडे-मसुरे १ अशा गाड्या धावणार आहेत.
कणकवली आगारातून ३७ गाड्या, असगणी-असरोंडीवरून २, रामगडवरून १, देवगड २, आचरा ४, हिंदळे मुणगे ३, तोंडवली-तळाशिल १, कुडोपी १, आरे-निरोम १, आचरा-चिंदर-त्रिंबक १ गाडी असे नियोजन करण्यात आले आहे. (वार्ताहर)
यात्रेचे नियोजन : रेल्वेस्थानक ते आंगणेवाडी थेट गाड्या
यात्रोत्सवासाठी अनेक भाविक रेल्वेने सिंधुदुर्गात दाखल होत असतात. त्यांच्या सोयीसाठी कणकवली, कुडाळ, सिंधुदुर्गनगरी, वैभववाडी या रेल्वे स्थानकांवरून प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार आंगणेवाडीपर्यंत एस.टी.ची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना सोयीचे होणार आहे. भाविकांसाठी २१ ते २५ फेब्रुवारीपर्यंत कणकवली रेल्वे स्टेशन येथून मालवण व आंगणेवाडी परिसरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
एस.टी. सेवेचा लाभ घ्या : हसबनीस
भाविकांच्या सोयीसाठी त्यांच्या मागणीनुसार एसटीच्या गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन दिवसांच्या या यात्रेकरीता जास्तीत जास्त एस.टी. गाड्या सोडून भाविकांना वेळेत यात्रास्थळी नेण्याचे नियोजन केले आहे. सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या सेवेचा लाभ घ्या, असे आवाहन विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी केले आहे.