सिंधुदुर्गात १५२ जोखीमग्रस्त गावे निश्चित, योगेश साळे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 03:57 PM2018-05-12T15:57:23+5:302018-05-12T15:57:23+5:30
येत्या पावसाळी मोसमात जिल्ह्यात साथीचे आजार उद्भवू नयेत आणि ते उद्भवले तर त्यावर तत्काळ उपाययोजना करता यावी यासाठी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. पावसाळा कालावधीत साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून जोखीमग्रस्त गाव निश्चित करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गनगरी : येत्या पावसाळी मोसमात जिल्ह्यात साथीचे आजार उद्भवू नयेत आणि ते उद्भवले तर त्यावर तत्काळ उपाययोजना करता यावी यासाठी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. पावसाळा कालावधीत साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून जोखीमग्रस्त गाव निश्चित करण्यात आले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यात मिळून एकूण १५२ गावे जोखीमग्रस्त म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. यात ७७ लेप्टो स्पायरोसिस बाधित गावांचा समावेश आहे.
या सर्व गावांमध्ये प्रतिबंधक उपाययोजना हाती घेण्यात आली आहे. या गावांसह जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा सुरळीत रहावी यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, तालुकास्तर तसेच जिल्हास्तरावर साथरोग नियंत्रण कक्ष १ जूनपासून सुरू करण्यात येणार असून हे कक्ष सप्टेंबरपर्यंत २४ तास कार्यरत राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
पाऊस आला की लेप्टो स्पायरोसिस, चिकनगुनिया, स्वाईन फ्ल्यू तसेच साथीचे विविध आजार उद्भवतात. हे आजार उद्भवू नयेत, तसेच हे आजार उद्भवले तर त्यावर नियंत्रण मिळविता यावे यासाठी जिल्हा आरोग्य विभागामार्फत सर्वतोपरी दक्षता घेतली जाते.
दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जिल्हा आरोग्य विभागामार्फत साथरोग जोखीमग्रस्त गावांची निश्चिती केली जाते आणि पाऊस पडण्या अगोदरपासूनच सर्व उपाययोजना केल्या जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१८-१९ या कालावधीसाठी एकूण १५२ गावे जोखीमग्रस्त म्हणून निश्चित करण्यात आली असून जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना साथरोग नियंत्रण संदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १ जूनपासून साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. तसेच तालुका आणि जिल्हास्तरावरही हे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा साथरोग नियंत्रणासाठी सज्ज झाली असून आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे. या पावसाळ्यात साथरोगाचा कोणताही प्रादुर्भाव जाणवू नये आणि तो जाणवला तर त्यावर तत्काळ उपाययोजना करता यावी अशी रचनाही करण्यात आली असल्याचे डॉ. साळे यांनी यावेळी स्पष्ट केले.