जिल्ह्यात १७८ टॉवर थ्रीजीने जोडणार
By admin | Published: August 22, 2015 12:18 AM2015-08-22T00:18:42+5:302015-08-22T00:20:10+5:30
विनायक राऊत यांचे आश्वासन : दूरसंचार सल्लागार समितीची सावंतवाडीत बैठक
सावंतवाडी : सिंधुदुर्गमध्ये येत्या काही दिवसात १७८ टॉवरवर थ्री जी सेवा देण्याचा दूरसंचार विभागाचा विचार आहे. तर जिल्ह्यातील ३६२ ग्रामपंचायती पहिल्या टप्प्यात आॅप्टीकल फायबरने जोडल्या जातील, असे निर्णय सिंधुदुर्ग दूरसंचार विभागाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आले. तसेच चतुर्थीच्या काळात मोबाईल सेवेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेशही खासदार विनायक राऊत यांनी दिले आहेत.
सिंधुदुर्ग दूरसंचार विभागाच्या सल्लागार समितीची बैठक सावंतवाडीतील दूरसंचार विभागाच्या सभागृहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार भालचंद्र मुणगेकर होते. तर दूरसंचारचे महाप्रबंधक सुहास कांबळे, उपमहाप्रबंधक बी. एस. बिराजदार, माजी आमदार राजन तेली, सल्लागार समिती सदस्य रूपेश राऊळ, विलास साळसकर, दीपलक्ष्मी पडते, राजन नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी सल्लागार समिती सदस्यांनी जिल्ह्यातील दूरसंचारच्या अडचणी मांडल्या. यात देवगड येथील विलास साळसकर यांनी केबल चोरीबाबत खासदारांचे लक्ष वेधले. त्यात आरोपींना रंगेहात पकडूनही पोलीस त्यांना सोडून देतात, असा प्रकार निदर्शनास आणून दिला. दीपलक्ष्मी पडते यांनी कुडाळमधील काही ठिकाणी मोबाईल रेंज मिळत नाही व बिलाबाबत तक्रारी केल्या. याबाबत दूरसंचारचे महाप्रबंधक सुहास कांबळे यांनी चोरीचे प्रकार होत असल्याचे सांगत आम्ही वेळोवेळी तक्रारी करतो, असे स्पष्ट केले. माजी आमदार राजन तेली यांनी केबल चोरीबाबत दोन्ही खासदारांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याशी बोलून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. खासदार विनायक राऊत यांनी जिल्ह्यात १५६ अधिकारी कमी आहेत. असे असताना राज्यात बीएसएनएलचे सर्वात चांगले काम हे सिंधुदुर्गमध्ये सुरू असून, गेल्या आर्थिक वर्षात १६ कोटीचा नफा या विभागाने मिळवून दिल्याचे सांगितले. त्यामुळे कमी असलेल्या अधिकाऱ्यांची पदे त्वरित भरण्याबाबत मी व खासदार मुणगेकर संयुक्तपणे दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच टॉवरबाबत अनेक तक्रारी असून मोबाईल सेवा सर्व ठिकाणी व्यवस्थित मिळावी, यासाठी दूरसंचारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची लवकरच मुंबई येथे बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्गमध्ये ४५० च्या जवळपास ग्रामपंचायती असून त्यातील ३६२ ग्रामपंचायती पहिल्या टप्प्यात आॅप्टीकल फायबरने जोडल्या जाणार आहेत. तर उर्वरित ग्रामपंचायती दुसऱ्या टप्प्यात जोडल्या जातील, असे यावेळी खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. १७८ टॉवरने थ्री जी सेवा देण्याचा प्रारंभ लवकरच करण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित टॉवर जोडले जातील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)