आमदार नितेश राणेंसह 19 जणांना सशर्त जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 04:32 PM2019-07-10T16:32:54+5:302019-07-10T16:35:49+5:30
उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नितेश राणेंसह 19 जणांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.
कणकवली :- उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नितेश राणेंसह 19 जणांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने प्रत्येकी २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे. जामीन मंजूर करतानाही न्यायालयानं काही अटी-शर्थी ठेवल्या आहे. या प्रकरणात नितेश राणेंना पोलिसांना सहकार्य करावं लागणार असून, अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा होणार नसल्याचीही ग्वाहीही त्यांनी दिली आहे. तसेच कणकवली पोलीस स्टेशनमध्ये दर रविवारी नितेश राणेंना हजेरी लावावी लागणार असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, महामार्ग प्राधिकरण उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह 19 आंदोलकांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आरोपींनी जामीन मिळावा म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला असता, न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला आहे.
कणकवली येथे ४ जुलै रोजी महामार्ग दुरवस्थेवरून महामार्ग प्राधिकरण उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर आंदोलकांनी चिखलफेक करीत गडनदी पुलाला बांधून ठेवण्याचाही प्रयत्न केला होता. याबाबत तक्रार शेडेकर यांनी ४ जुलै रोजी सायंकाळी कुडाळ पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यानुसार नितेश राणे यांच्यासह १८ स्वाभिमान कार्यकर्त्यांना अटक झाली होती. यामध्ये कणकवली नगराध्यक्ष समीर अनंत नलावडे(४५, कणकवली ), उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड(४५, कणकवली), संजय मधुकर कामतेकर(४६, कणकवली ), राकेश बळीराम राणे(३५, कणकवली ), अभिजित भास्कर मुसळे(४२, कणकवली ), निखिल आचरेकर(३६ ,कणकवली ), राजन श्रीधर परब(५४, कणकवली ), संदीप रमाकांत सावंत (३५, वागदे), लक्ष्मण संभाजी घाडीगांवकर ( ४२, वागदे ), संदीप चंद्रकांत मेस्त्री ( ३६, कलमठ ), सदानंद उर्फ बबन गोविंद हळदिवे(६०, फोंडाघाट), किशोर जगन्नाथ राणे(५२, कणकवली ), शिवसुंदर शाहू देसाई(२४, कणकवली), सचिन गुणाजी पारधिये(३६, कळसुली ), विठ्ठल दत्ताराम देसाई(५५, कणकवली), मिलिंद चंद्रकांत मेस्त्री(३५, कलमठ ), संदीप बाळकृष्ण नलावडे(३६, कणकवली ) यांचा समावेश होता.
तर माजी नगराध्यक्षा मेघा अजय गांगण (४२, कणकवली ) यांना शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली होती. या १९ जणांवर शासकीय कामात अडथळा, कटकारस्थान रचणे, रस्ता अडविणे यासह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले होते. ५ जुलै रोजी आमदार नितेश यांच्यासह अटकेतील सर्व आंदोलकांना कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ९ पर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपत असल्यामुळे दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सर्व संशयितांना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले.