गणेशोत्सवात कोकणात १९४५ गाड्या
By admin | Published: August 30, 2015 10:47 PM2015-08-30T22:47:00+5:302015-08-30T22:47:00+5:30
भक्तांची सोय : कुर्ल्यातील प्रादेशिक कार्यालयात वाहतुकीचे नियोजन
चिपळूण : कोकणात गौरी-गणपती उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोकणात घरोघरी गणपतीची मूर्ती आणून मनोभावे पूजा केली जाते. दरवर्षी चाकरमानी या उत्सवासाठी आपल्या गावाकडे येत असतात. या अनुषंगाने मुंबई, ठाणे येथून १ हजार ९४५ एस. टी. बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्हा कोकण प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर शिर्के यांनी दिली. कुर्ला येथील प्रादेशिक कार्यालयात गौरी - गणपती सणानिमित्त वाहतूक नियोजनाबाबत प्रादेशिक व्यवस्थापक राहुल तोरो यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी एस. टी.च्या गाड्यांचे नियोजन करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातून ३३२ खिडकीवर, तर ग्रुप बुकिंगकरिता ४१४ खिडकीवर अशा ७४६ जादा बस सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये कल्याण आगारातून २८ एस. टी. बसेस, तर विठ्ठलवाडी आगारातून १०९ जादा बसेस अशा १३७ जादा गाड्या कोकणात धावणार आहेत. सावंतवाडी, मालवण, देवगड, नाटे, रत्नागिरी, कणकवली, राजापूर, माखजन, साखरपा, देवरुख, भडवली, शिरवली, गुहागर, गराटेवाडी, चिपळूण दापोली, चोरवणे, पोलादपूर, महाड व अलिबाग मार्गावर या बसेस सोडण्यात येणार आहेत. गणेशोत्सव काळात स्थानकात असलेली अस्वच्छता दूर करून आरक्षण देताना स्टेजेसची माहिती नियंत्रकांना असायला हवी. ४४ ऐवजी ३९ आसने असणाऱ्या बसेस, गळक्या गाड्या यांची अधिकाऱ्यांनी प्रवाशांना योग्य माहिती देणे, आगारप्रमुखांनी वाहतुकीचे नियोजन चांगल्या प्रकारे करणे, विभाग नियंत्रकांचे आदेश पाळणे, गाडीवर ताडपत्र्या टाकणे, गाडीत प्रथमोपचार पेटीची व्यवस्था करणे, बाहेरुन येणाऱ्या चालकांना रस्त्याची माहितीपत्रके देणे, याबाबत बैठकीत चर्चा झाली. एस. टी. सोडण्यासंदर्भात समस्या निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी. कोकणात येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार नाही, असे आश्वासन प्रादेशिक व्यवस्थापक तोरो यांनी दिले असल्याचे कोकण प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिर्के यांनी सांगितले. (वार्ताहर)
मुंबई, ठाणे येथून १ हजार ९४५ एस. टी. बसेस सोडण्यात येणार.
ठाणे जिल्ह्यातून ३३२ खिडकीवर, तर ग्रुप बुकिंगकरिता ४१४ अशा ७४६ जादा बस सोडण्याची व्यवस्था.
विठ्ठलवाडी आगारातून १०९ जादा बसेस अशा १३७ जादा गाड्या.
विविध मार्गांवर सुटणार बसेस.