सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच १९६ इलेक्ट्रिक बस धावणार, पाच चार्जिंग सेंटर उभारणार
By सुधीर राणे | Published: April 20, 2023 02:41 PM2023-04-20T14:41:58+5:302023-04-20T14:42:14+5:30
चार्जिंग सेंटर एसटीच्या मालकीची
कणकवली: पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी तसेच डिझेलच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने तब्बल ५१५० इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी ४५९३ बसेस राज्यातील विविध जिल्ह्याना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध आगाराना १९६ इलेक्ट्रिक बस टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार असल्याची माहिती एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत ५१५० इलेक्ट्रिक बस राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सेवेत आणणार आहे. या इलेक्ट्रिक बस राज्यातील १०१ एसटी आगारांना देण्यात येणार असून त्यासाठी १७२ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी पाच चार्जिंग सेंटर सिंधुदुर्गात असतील. त्यामध्ये देवगड,वेंगुर्ला, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या ठिकाणांचा समावेश आहे. ही चार्जिंग सेंटर एसटीच्या मालकीची असतील. ती चार्जिंग सेंटर उभारण्यासाठी येणारा अंदाजित खर्च कळविण्याबाबत वीज मंडळाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
पूर्ण चार्जसाठी सहा तासांचा अवधी
ही चार्जिंग सेंटर सुरू झाली की टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बस सिंधुदुर्गात धावू लागतील. एक इलेक्ट्रिक बस पूर्ण चार्ज होण्यासाठी सहा तासांचा अवधी लागतो. एकदा पूर्ण चार्ज केलेली बस ३५० किलोमीटर धावू शकेल. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. तसेच येथील जास्त भाग ग्रीन झोन अंतर्गत येत असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने जास्त इलेक्ट्रिक बस म्हणजेच १९६ गाड्या सिंधुदुर्गसाठी देण्यात येणार आहेत. साधारणतः सहा महिन्यांचा कालावधी चार्जिंग सेंटरसह सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायला लागेल. त्यानंतर या बस जिल्ह्यात धावतील. ४४ सीटच्या या बस असणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
ठाणे जिल्ह्यासाठी २३० इलेक्ट्रिक बस, रत्नागिरी जिल्ह्यासाठी १३७ बस, रायगड जिल्ह्यासाठी ४५ तर मुंबईसाठी २५ बस दिल्या जाणार आहेत असेही अभिजित पाटील यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग विभागासाठी अद्ययावत बस मिळणार!
एसटी महामंडळाने नवीन गाडय़ांची बांधणी दापोडीसह राज्यातील तिन्ही कार्यशाळेत सुरू केली आहे. सध्या एसटीच्या सिंधुदुर्ग विभागात ३९३ गाड्या आहेत. अलीकडेच १० नवीन गाड्या मिळाल्या असून सावंतवाडी आगाराला त्या देण्यात आल्या आहेत. आगामी काळात सिंधुदुर्ग विभागाला अद्ययावत बस मिळणार आहेत. त्यात ४० मोठ्या बस, २० एशियाड-हिरकणी बस व २० मिडी बस सिंधुदुर्ग विभागाला मिळणार आहेत. असेही अभिजित पाटील यांनी सांगितले.