जिल्ह्यातील १ ली ते ८ वीच्या शाळा उद्यापासून बंद, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 10:37 PM2022-01-05T22:37:13+5:302022-01-05T22:37:53+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेशांपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे.
सिंधुदुर्ग: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मुंबईसह महानगरात रुग्णसंख्या दुप्पटीने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. तर, राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेशही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांनी दिले आहेत. आता, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळा ६ जानेवारी पासून बंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्षमी यांनी दिल्या आहेत. त्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी बुधवारी तसे आदेश सर्व शाळांना काढले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेशांपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, मुंबईत आज तब्बल 15 हजार रुग्ण आढळून आले असून दिवसेंदिवस ही रुग्णसंख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात येत आहेत.