चिपळुणात खंडणीचे २ गुन्हे दाखल
By admin | Published: June 19, 2016 12:52 AM2016-06-19T00:52:10+5:302016-06-19T00:55:30+5:30
नऊजणांविरुद्ध गुन्हा : परस्पर विरोधी तक्रार दाखल; पोलिस अधीक्षकांनी दिली भेट
अडरे : विवाहितेच्या विनयभंगाच्या तक्रारीचे वृत्त छापून आणू, अन्यथा ५ लाख रुपये खंडणी द्या, अशी मागणी केल्याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात नऊजणांविरुध्द तर दुसऱ्या प्रकरणात ५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांविरुध्द शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणाची दखल पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी घेतली असून, त्यांनी शनिवारी येथील पोलिस ठाण्यास भेट देऊन या प्रकरणाची चौकशी केली. दोषी असल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, कापसाळ येथे एका महिलेची वडापाव विक्रीची गाडी आहे. ही महिला पाणी आणण्यासाठी नजीकच्या शासकीय विश्रामगृहावर जात असे. त्यावेळी ती महेश भुरण व दीपक दाते यांच्या परवानगीने पाणी भरत असे. काही दिवसांपूर्वी या दोघांनी आपला विनयभंग केला, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत आपण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो असता पोलिसांनी आपल्या पतीस मारहाण करून अपमानास्पद वागणूक दिली, असे त्या महिलेचे म्हणणे आहे. योग्य न्याय न मिळाल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी महादेव गावडे यांच्याकडे या महिलेने तक्रार दिली असून, दाते व भुरण यांच्याविरुद्ध विनयभंग तसेच अॅट्रासिटी अॅक्ट खाली गुन्हा दाखल झाला आहे.
याच प्रकरणात महिलेचा विनयभंग केल्याची बातमी छापून आणू, तुला बदनाम करू अन्यथा हे प्रकरण मिटवण्यासाठी ५ लाख रुपये द्या, अशी धमकी देण्यात आल्याची फिर्याद महेश भुरण यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. भुरण यांनी २५ हजारांचा पहिला हप्ता संतोषी मोहिते (कापसाळ), अश्विनी भुस्कुटे, अशोक भुस्कुटे, पत्रकार राजेश जाधव, संदेश मोहिते, अनंत पवार, जयंत जाधव, रमेश मोहिते व जवाहर चंदनशिवे (चिपळूण) यांना दिला. त्यानंतर याबाबतची तक्रार त्यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार ९ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबरोबरच वनिता चव्हाण नामक महिलेने त्यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याची तक्रार चिपळूण पोलिस ठाण्यात दिली आहे. हा प्रकार दि.१९ एप्रिल २०१६ ते दि.१७ जून २०१६ या कालावधीत घडला असे फिर्यादीत म्हटले आहे. स्वाती सदाशिव हडकर या महिलेने आपल्या मुलाची पोलिस मित्र होण्यासाठी भेट घेतली. त्यातून त्यांची मैत्री झाली. त्यानंतर मुलाकडे तिने काही मागण्या केल्या. त्या मागण्या त्याने अमान्य केल्या. त्यामुळे हडकर हिने अश्विनी भुस्कुटे, अशोक भुस्कुटे यांना सोबत घेऊन माझा मुलगा, पती व सून या तिघांकडे ५ लाख रुपये द्या, अन्यथा तुमच्याविरोधात तक्रार देऊन बदनामी करू अशी धमकी दिली. त्यामुळे आम्ही घाबरुन संशयितांना २ लाख रुपये भुस्कुटे यांच्या घरी नेऊन दिले. उरलेल्या ३ लाख रुपयांची मागणी अश्विनी भुस्कुटे यांनी केली असे वनिता चव्हाण यांनी तक्रारीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी तिघा संशयितांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक सुहास वाक्चौरे करीत आहेत. (वार्ताहर)
दातेंच्या पाठीशी सर्व पक्ष उभे!
पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांची सर्वपक्षीय नेत्यांनी भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, क्षेत्राध्यक्ष बाळा कदम, मनसे तालुकाप्रमुख संतोष नलावडे, भाजप शहरप्रमुख निशिकांत भोजने, भारिपचे सुभाष जाधव, काँग्रेसचे प्रफुल्ल भिसे, संदेश भालेकर, शिवसेना शहरप्रमुख राजू देवळेकर, उपशहरप्रमुख उमेश सकपाळ, युवा सेनेचे बापू आयरे, विभागप्रमुख उमेश खताते, समीर टाकळे, गटनेते विश्वनाथ फाळके, विकी नरळकर, युवासेनेचे विशाल खताते, निहार कोवळे, सुनील दाते यांच्याबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी पोलस स्टेशनवर धडक दिली. प्रणय अशोक यांची भेट घेऊन दीपक दाते यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात जर दाते यांना अटक झाली तर सर्व पक्ष मिळून आंदोलन छेडू असे सांगण्यात आले. दाते हे प्रामाणिक माणूस आहेत. त्यांना कोणी विनाकारण बदनाम करत असेल व अटक होत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा देण्यात आला.