प्रतिभा डेअरीकडून शेतकर्‍यांचे २ कोटी ७७ लाख रूपये थकीत, मंत्री सामंत यांनी दिले चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 06:36 PM2021-11-17T18:36:58+5:302021-11-17T18:37:58+5:30

सावंतवाडी : कोल्हापुरातील कोडोली येथील प्रतिभा कृषी प्रक्रिया लि. कंपनीकडून २ कोटी ७७ लाख रूपये दुधाची थकीत रक्कम सिंधुदुर्ग ...

2 crore 77 lakh due to farmers from Pratibha Dairy Minister Samant orders inquiry | प्रतिभा डेअरीकडून शेतकर्‍यांचे २ कोटी ७७ लाख रूपये थकीत, मंत्री सामंत यांनी दिले चौकशीचे आदेश

प्रतिभा डेअरीकडून शेतकर्‍यांचे २ कोटी ७७ लाख रूपये थकीत, मंत्री सामंत यांनी दिले चौकशीचे आदेश

Next

सावंतवाडी : कोल्हापुरातील कोडोली येथील प्रतिभा कृषी प्रक्रिया लि. कंपनीकडून २ कोटी ७७ लाख रूपये दुधाची थकीत रक्कम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकर्‍यांची येणे बाकी आहे. कंपनीकडे वारंवार विनंती करूनही त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल, मंगळवारी लाक्षणिक उपोषण केले. मंत्री उदय सामंत यांनी यावर शेतकऱ्यांशी संवाद साधत संबधित कंपनीची पोलिसांकडून चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे एम.के. गावडे यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण तुर्त स्थगित केले.

प्रतिभा कृषी प्रक्रिया लि. कोडोली, कोल्हापूर या कंपनीने सिंधुदूर्ग जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाकडून ११ एप्रिल २०१७ पासून दुध खरेदी सुरु केली. पहिले ६ महिने त्यांनी शेतकर्‍यांचे ठरल्याप्रमाणे पेमेंट अदा केले. दुध संकलन सुरु करण्यापूर्वी प्रतिभा दुध कंपनीचे चेअरमन सतिश चव्हाण व व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी चव्हाण यांनी शेतकर्‍यांना नवीन जनावरे, चारा, पशुखाद्य आदी देण्याबाबत मोठी आश्वासने दिली होती. मात्र एकाही आश्वासनाची पुर्तता त्यांच्याकडून झाली नाही.

याउलट पुढील ६ महिन्यात प्रतिभा कंपनीकडून  शेतकर्‍यांचे दूधाचे पैसे येणे बंद झाले. याप्रश्नी अनेक वेळा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या प्रधान कार्यालयात शेतकर्‍यांसमवेत सभा आयोजित केल्या. प्रत्येक वेळी १५ दिवस महिन्याची मुदत मागून घेतली तरीही शेतकर्‍यांना पैसे प्राप्त झाले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाला दूध देणे हळूहळू बंद केले.

सद्यस्थितीत  प्रतिभा  दुध कंपनीकडे जिल्ह्यातील गरीब शेतकर्‍यांच्या दूध बिलाचे, दूध संघाचे तसेच दूध बिलासाठी घेतलेले वैयक्तिक कर्ज मिळून रु. २ कोटी ७७ लाख  आणि त्यावरील व्याज रक्कम मिळून येणे आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी आपल्या गाई म्हैशी विकून बँकेचे हफ्ते दिले. वाहतूकदारांची वाहने बँकेने ओढून नेली. तसेच प्रतिभा दुध कंपनीने सिंधुदुर्ग जिल्हा दुध संघाला दिलेला ६६ लाख रूपयाचा चेक दोन वेळा बाऊस् झाला. तरीही चव्हाण कुटुंबियांना त्याच काहीच सोर सुतक नाही. त्यामुळे आम्ही आज हे उपोषण केले असल्याची कैफीयत दुध उत्पादक शेतकरी व दुध संस्थांनच्या वतीने एम.के. गावडे यांनी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दिपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या समोर मांडली.

यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत ,युवा नेते संदेश पारकर यांनी संबंधित कंपनीवर कारवाई व्हावी अशी मागणी केली. त्यानंतर मंत्री सामंत यांनी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून योग्य चौकशी होईल अशी हमी ही मंत्री सामंत यांनी दिली त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

Web Title: 2 crore 77 lakh due to farmers from Pratibha Dairy Minister Samant orders inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.