बांद्यात ५ लाखांचा दारूसाठा जप्त, कारसह युवक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 03:55 PM2020-03-19T15:55:11+5:302020-03-19T15:57:56+5:30
गोव्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या बेकायदा दारुच्या वाहतुकीविरोधात उत्पादन शुल्क मुंबईच्या भरारी पथकाने कारवाई करून ५ लाख २१ हजार ८०० रुपयांचा दारूसाठा जप्त केला.
बांदा : गोव्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या बेकायदा दारुच्या वाहतुकीविरोधात उत्पादन शुल्क मुंबईच्या भरारी पथकाने कारवाई करून ५ लाख २१ हजार ८०० रुपयांचा दारूसाठा जप्त केला.
या प्रकरणी दारू वाहतुकीसाठी वापरलेली कार जप्त करून चालक सुजित विजय तिळवे याला अटक करण्यात आली. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबईच्या भरारी पथकाने मंगळवारी रात्री केली. त्यामुळे इन्सुली उत्पादन शुल्क व बांदा पोलिसांचा चेकनाका हे फक्त नावापुरते असल्याचे दिसून येत आहे.
गोव्यातून सिंधुदुर्गात गोवा बनावटीची दारू वाहतूक होणार असल्याची माहिती मुंबईच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार बांदा पिंपळेश्वर चौकात सापळा रचण्यात आला होता.
संशयित कार पत्रादेवी मार्गावरून येत असताना ती तपासणीसाठी थांबविण्यात आली.
कारची तपासणी केली असता कारमध्ये दारुचे ५५ खोके आढळून आले. चालक सुजित तिळवे याने हा दारूसाठा सावंतवाडी येथील प्रकाश पाटील यांचा असल्याचे चौकशीत सांगितले. त्यावरून दारूसाठा मालक प्रकाश पाटील व मद्यसाठा पुरवठादार यांना फरार घोषित करून गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक दीपक परब, दुय्यम निरीक्षक डी. बी. काळेल, जवान विशाल बस्त्याव, दीपक कळंबे, विक्रम कुंभार यांच्या पथकाने केली. अधिक तपास निरीक्षक दीपक परब करीत आहेत.