'कुणबी आरक्षणाचा फायदा सिंधुदुर्गातील 20 हजार मराठा बांधवांना होणार' 

By अनंत खं.जाधव | Published: January 29, 2024 07:24 PM2024-01-29T19:24:32+5:302024-01-29T19:25:07+5:30

अॅड.सुहास सावंत यांचा दावा : प्रशासनावर मात्र नाराज 

20 thousand Maratha of Sindhudurg will benefit from Kunbi reservation | 'कुणबी आरक्षणाचा फायदा सिंधुदुर्गातील 20 हजार मराठा बांधवांना होणार' 

'कुणबी आरक्षणाचा फायदा सिंधुदुर्गातील 20 हजार मराठा बांधवांना होणार' 

सावंतवाडी : कुणबी आरक्षणाचा फायदा सिंधुदुर्गातील २० हजारहून अधिक मराठा बांधवांना होणार आहे, असा दावा अखिल भारतीय मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांनी केला आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनावर यावेळी मात्र त्यांनी नाराजी व्यक्त केली प्रशासनाने कुणबी दाखले शोधण्यात तत्परता दाखवली नसल्याचा आरोप केला आहे. यावेळी विकास सावंत, पुंडलिक दळवी, अभिषेक सावंत उपस्थित होते.

सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडुन आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर होणार्‍या सर्व्हेत ढिलाई होत आहे, मात्र आम्ही सर्वजण जिल्ह्यातील समाज बांधवांना आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी योग्य पध्दतीने सर्व्हेक्षण केले जावे, प्रयत्न करणार आहोत.

मराठे युध्दात जिंकले, मात्र तहात हरले, अशी टिका काही लोकांकडून करण्यात येत आहे यावर सावंत यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, या ठिकाणी आम्ही तहात हरलो, असे कोण म्हणत असेल तर ते चुकीचे आहे. जरांगे पाटील यांच्या आरक्षणाचा फायदा सिंधुदुर्ग,रत्नागिरी जिल्ह्याला सुध्दा झाला आहे. 

सद्यस्थितीत करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात १४०० नोंदी सापडल्या आहेत. त्याचा फायदा २० हजारहून अधिक बांधवाना होणार आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सगे सोयरे या शब्दाचा आधार घेवून ज्यांना दाखले मिळण्यास अडचणी येणार त्यांना दाखले मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत.

ते पुढे म्हणाले, या ठिकाणी आम्ही महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी अभिषेक सावंत यांना नियुक्ती दिली आहे. यावेळी उपस्थितांच्या हस्ते सावंत यांना नियुक्तीपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष आशिष काष्टे, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष मनोहर येरम, संजय लाड, अब्जू सावंत, विशाल सावंत, प्रशांत ठाकूर, नंदादीप विचारे, शिवदत्त घोगळे, सतीश सावंत, सुनील सावंत, अभिजीत सावंत, प्रसाद राऊळ, सूर्यकांत राऊळ, मुकेश जाधव, संदीप गवस आदी उपस्थित होते.

Web Title: 20 thousand Maratha of Sindhudurg will benefit from Kunbi reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.