रत्नागिरी-सिंधुदुर्गलाच हवेत २00 कोटी
By admin | Published: June 23, 2016 12:00 AM2016-06-23T00:00:09+5:302016-06-23T01:21:17+5:30
आशा पल्लवीत : आता प्रतीक्षा जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासन पूर्ततेची
प्रकाश वराडकर -- रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपूर्णावस्थेत असलेल्या सिंचन प्रकल्पांची संख्या ५०पेक्षा अधिक आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २०० कोटींपेक्षा अधिक निधीची आवश्यकता आहे. कोकणातील अपूर्णावस्थेत असलेल्या जलसिंचन प्रकल्पांसाठी ४०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी दिले आहे. त्यातील ५० टक्के निधी हा रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांनाच द्यावा लागणार आहे. अन्य अपूर्ण प्रकल्प पाहता या दोन्ही जिल्ह्यांच्या वाट्याला किती निधी मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांतील सिंचन प्रकल्पांची मुख्य कार्यालये रत्नागिरी येथे आहेत. याठिकाणी असलेल्या लघुसिंचन जलसंधारण विभागांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३६ लघुसिंचन प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्प कामांसाठी आत्तापर्यंत २३८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित कामांसाठी १७६ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात या विभागांतर्गत पेंडूर, नानिवडे महाजनवाडी व किर्लोस हे तीन प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर १४ प्रकल्प हे अपूर्ण अवस्थेत आहेत. प्रकल्पांसाठी आत्तापर्यंत १५४ कोटी रुपये खर्च झाले असून, आणखी २३.७३ कोटी रुपये एवढ्या मोठ्या निधीची आवश्यकता आहे. या विभागांतर्गत येणारे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ३५ प्रकल्प याआधीच रद्द करण्यात आले आहेत.
रत्नागिरीत ३६ प्रकल्प अपूर्ण
जिल्ह्यात अपूर्ण असलेल्या जलसिंचन प्रकल्पांमध्ये सुकोंडी-वाघिवणे, राजेवाडी, जुवाठी, तळवली, इंदवटी, कुवे, चिंचाळी, मोर्डे, परुळे, हर्दखळे, तिवरे, वाटूळ, ताडील, वाळवट मूर, शिंदेआंबेरी, खडी ओझर, सोनारवाडी, कोंडवली, रेवली, कासई कावळे, जामगे-विसापूर, वावे, खानू, जड्यारवाडी, पानवल, कादिवली, कोंडगे, आरगाव, शिवणे, कुरवळ, फुरुस चव्हाणवाडी, मुसाड, कोसबी, कुडुक खुर्द, फुरुस कदमवाडी, कुरंग यांचा समावेश आहे. तर पूर्ण झालेल्या प्रकल्पांमध्ये तुळशी, शिलडी, गोपाळवाडी, करोळी, जामगे भोवरा, तांबेडी या लघुसिंचन प्रकल्पांचा समावेश आहे.
सिंधुदुर्गात १४ प्रकल्प अपूर्ण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लघुसिंचन जलसंधारण विभागांतर्गत १४ जलसिंचन प्रकल्पांची कामे अपूर्ण आहेत. त्यामध्ये जानवली, विलवडे, कोकिसरे, सावडाव, शिरवळ, वागदे, आंब्रड, वर्दे, नानिवडे, करूळ-जामदारवाडी, डोना, ओवळीये, कुंभवडे, ऐनारी या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांचे काम रेंगाळल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश विभागात पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच या प्रकल्पांमुळे शेकडो एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण होण्यासाठी शासनकर्त्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
अर्जुना, मुचकुंदी, चिंचवाडीचे कालवे
अजून अपूर्ण
पाटबंधारे बांधकाम विभाग, रत्नागिरी अंतर्गत येणाऱ्या अर्जुना, चिंचवाडी व मुचकुंंदी प्रकल्पांची धरणे पूर्ण झाली आहेत. या तीनही धरणांच्या प्रत्येकी दोन कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. त्यासाठीही काही कोटी निधीची आवश्यकता आहे. ही अपूर्ण कामे कधी पूर्ण होणार? असा सवाल होत आहे. रत्नागिरी पाटबंधारे विभागाकडील १ मध्यम, २३ लघु व कोकण पध्दतीचे ५ बंधारे मिळून २८ प्रकल्पांची कामे पूर्ण आहेत. या विभागाकडील कोणताही धरणप्रकल्प सध्या अपूर्ण नाही.
४०० कोटींचे आश्वासन पूर्ण होणार?
कोकणातील अपूर्ण जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येत्या १८ जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून ४०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत दिले आहे. त्यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक उपस्थित होते. मंत्र्यांनी तर आश्वासन दिले आहे. त्याची पूर्तता किती प्रमाणात होणार, जलसिंचन प्रकल्पांना नक्की किधी निधी मिळणार, हे येत्या पावसाळी अधिवेशनातच स्पष्ट होणार आहे.