२00 नौकांची तपासणी
By admin | Published: December 9, 2014 08:22 PM2014-12-09T20:22:47+5:302014-12-09T23:21:41+5:30
बेकायदेशीर मासेमारीविरोधात प्रशासन आक्रमक
मालवण : सिंधुदुर्गातील समुद्रात बेकादेशीर मिनी पर्ससीननेट मासेमारी विरोधात पारंपरिक मच्छिमारांनी आवाज उठविल्यानंतर मत्स्य विभागाने बेकायदेशीर मच्छिमारी विरोधात धडक पावले उचलली. यामुळे बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून त्यांनी आपली बेकायदेशीर नौका तसेच इतर मासेमारी साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, सोमवारी मत्स्य विभागाने वेंगुर्ला किनारपट्टीवरील सुमारे २०० नौकांची तसेच मच्छिमारी जाळ््यांची तपासणी केली आहे.
रत्नागिरी येथील तीन परवाना अधिकारी तसेच सिंधुदुर्गातील अन्य परवाना अधिकाऱ्यांच्या पथकांसह सहाय्यक मत्स्य आयुक्त सुगंधा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत मासेमारीविरोधात कारवाईची मोहीम सुरूच ठेवली आहे. मत्स्य विभागांच्या पथकांनी सोमवारी वेंगुर्ले किनारपट्टी भागातील निवती, केळूस, कोचरा, श्रीरामवाडी, खवणे या भागातील सुमारे २०० नौकांची तसेच मासेमारी जाळ््यांची तपासणी केली.
वेंगुर्ले किनारपट्टी भागातील नौकांची छायाचित्रे घेण्यात आली आहेत. मोहिमेत अधिकारी व कर्मचारी सामील झाल्यामुळे सोमवारी मत्स्य व्यवसाय कार्यालयात शुकशुकाट दिसून आला.
दरम्यान, गेले चार-पाच दिवस सुरू असलेल्या धडक मोहिमेत केलेल्या कारवाईचे तहसीलदारांकडे प्रतिवेदन दाखल न केल्यामुळे कारवाईचा नेमका आकडा समजू शकला नाही. (प्रतिनिधी)