चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २०५ बसेस आरक्षित
By सुधीर राणे | Published: September 21, 2023 03:46 PM2023-09-21T15:46:22+5:302023-09-21T15:46:55+5:30
चाकरमान्यांना घेऊन सिंधुदुर्गमध्ये सुमारे ४०० गाड्या दाखल झाल्या आहेत.
कणकवली: गौरी-गणपतीच्या सणासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाकरीता एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज झाला आहे. आतापर्यंत परतीसाठी २०५ गाड्यांचे बूकिंग झाले आहे. तर यावर्षी सुमारे ४०० बसेसच्या माध्यमातून चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
आपल्या मूळ गावी दाखल झालेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्गचे एसटी विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. यात मुंबई व पुणेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी परतीच्या गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई, बोरीवली, नालासोपारा, निगडी, पुणे स्टेशन, चिंचवड, अर्नाळा, भाईंदर, भांडुप, ठाणे, विठ्ठलवाडी, कुर्ला नेहरुनगर, परळ आदी ठिकाणी या गाड्या सोडण्यात येणार आहेत.
चाकरमान्यांना घेऊन सिंधुदुर्गमध्ये सुमारे ४०० गाड्या दाखल झाल्या आहेत. यापैकी काही गाड्या या आगावू पैसे भरून बूकिंग झालेल्यापैकी होत्या. तर परतीच्या प्रवासासाठी सुमारे सव्वातीनशेच्या जवळपास गाड्या उपलब्ध आहेत. यापैकी २०५ गाड्यांचे बूकिंग आतापर्यंत झाले आहे. प्रवासी उपलब्धतेनुसार गाड्यांचे बूकिंग उपलब्ध असून प्रवाशांना एसटी बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाकडून करण्यात आले आहे.