सावंतवाडीत २१ दिवसांच्या गणेशाचे विसर्जन
By admin | Published: October 9, 2015 01:19 AM2015-10-09T01:19:19+5:302015-10-09T01:28:20+5:30
जय मल्हार देखावा आकर्षण : ढोल-ताशाच्या गजरात, डॉल्बीच्या निनादात मिरवणूक
सावंतवाडी : शहरातील २१ दिवसांच्या गणरायांना बुधवारी रात्री भक्तीमय वातावरणात निरोप दिला. उभाबाजार हनुमान मंदिर सार्वजनिक गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीतील पिंपरी-चिंचवड येथील प्रसिद्ध आवर्तन ढोल पथक व ‘जयमल्हार’ हा हालता देखावा विशेष आकर्षण ठरला. शहरातील तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींचे बुधवारी २१ व्या दिवशी भव्य मिरवणूक काढत येथील मोती तलावात निरोप देण्यात आला. यामध्ये सालईवाडा, उभाबाजार हनुमान मंदिर व वैश्यवाडा हनुमान मंदिर यांच्या सार्वजनिक गणपतींची मिरवणूक काढण्यात आली होती. उभाबाजार जय हनुमान मित्रमंडळातर्फे आकर्षक अशा पिंपरी-चिंचवड येथील ढोल पथकांचे नियोजन केले होते. या ढोल पथकात पुरूषांसह महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. तसेच जय मल्हार हा चलचित्र देखावा खास आकर्षण ठरला. सालईवाडा येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने डी. जे. साऊंड सिस्टीमने मिरवणुकीत रंगत आणली होती. या मिरवणुकीत डॉल्बीच्या निनादात भर पावसातही तरूण-तरूणी बेधुंद होऊन नाचत होते. वैश्यवाडा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत विविध देखावे दांडिया, फुगड्या व वारकरी, भजन मंडळांचे कार्यक्रम सादर करण्यात आले. यामुळे मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. सुरवातीला पावसाने काही काळ मिरवणुकीत गोंधळ निर्माण झाला होता. पण आठ नंतर रात्री उशीरापर्यंत पावसाने विश्रांती घेतल्याने मिरवणुकीत शहरवासीयांचा सहभाग वाढला होता. मोती तलावाशेजारी रंगीबेरंगी विविध फटाक्यांची करण्यात आलेली आतषबाजीही लोकप्रिय ठरली.(प्रतिनिधी)