२२ लाखांचे स्पिरीट जप्त, कर्नाटकमधील दोघांना अटक, बांदा पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 09:48 PM2018-01-09T21:48:24+5:302018-01-09T21:48:39+5:30
तेलंगणा येथून गोव्याच्या दिशेने विनापरवाना स्पिरीटची वाहतूक करणा-या टँकरवर बांदा पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा पोलिस तपासणी नाक्यावर कारवाई केली. या कारवाईत २२ लाख ५0 हजार रुपये किमतीच्या स्पिरीटसह एकूण ३0 लाख ५0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
बांदा - तेलंगणा येथून गोव्याच्या दिशेने विनापरवाना स्पिरीटची वाहतूक करणा-या टँकरवर बांदा पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा पोलिस तपासणी नाक्यावर कारवाई केली. या कारवाईत २२ लाख ५0 हजार रुपये किमतीच्या स्पिरीटसह एकूण ३0 लाख ५0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी टँकरचालक विलास कृष्णाजी घाटगे (२४, रा. विजापूर-कर्नाटक) व परशुराम हनुमंतराव खुंटोजी (३0, रा. कर्नाटक) यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. बांदा पोलिसांची स्पिरीट वाहतुकीविरोधातील ही अलिकडच्या काळातील दुसरी मोठी कारवाई आहे.
याबाबत बांदा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी रात्री उशिरा तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी सुरु असताना गोव्याच्या दिशेने जाणारा टँकर (के ए २८ सी १८४९) तपासणीसाठी थांबविण्यात आला. बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक जयदिप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विठोबा सावंत, शहाजी बुरुड, हेमंत पेडणेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
संदिग्ध उत्तरांनी संशय बळावला
सोमवारी रात्री उशिरा गोव्याच्या दिशेने जाणारा टँकर तपासणी नाक्यावर थांंबविण्यात आला. पोलिसांनी चालकाकडे प्राथमिक चौकशी केली असता त्याने संदिग्ध उत्तरे दिली. संशय आल्याने पोलिसांनी टँकरची तपासणी केली असता पाठीमागील टाकीत २२ लाख ५0 हजार रुपये किमतीचे बेकायदा स्पिरीट आढळले. पोलिसांनी स्पिरीट व ८ लाख रुपये किमतीचा टँकर असा एकूण ३0 लाख ५0 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक जयदिप कळेकर करीत आहेत.