पैसे मोजण्याच्या बहाण्याने २३ हजार रुपये केले लंपास, खारेपाटण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत चोरीच्या प्रकाराने खळबळ

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 13, 2023 06:44 PM2023-09-13T18:44:46+5:302023-09-13T18:45:34+5:30

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

23,000 rupees were stolen on the pretext of counting money, Kharepatan Sindhudurg district bank sensation of theft | पैसे मोजण्याच्या बहाण्याने २३ हजार रुपये केले लंपास, खारेपाटण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत चोरीच्या प्रकाराने खळबळ

पैसे मोजण्याच्या बहाण्याने २३ हजार रुपये केले लंपास, खारेपाटण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत चोरीच्या प्रकाराने खळबळ

googlenewsNext

खारेपाटण (सिंधुदुर्ग) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बुधवारी दुपारी १२:३० ते १२:४५ च्या दरम्यान अनोळखी व्यक्तीकडून हातोहात एका ग्राहकाच्या हातातील रोख रुपये १ लाख खेचून घेऊन रक्कम मोजण्याच्या बहाण्याने त्यातील २३५००/- रुपये काढून घेत उर्वरित रक्कम ग्रहकाला परत करत अज्ञात चोरट्याने तेथून लगेच पोबारा केला. या घटनेमुळे बँकेत तसेच खारेपाटण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

खारेपाटण बाजारपेठ येथे असलेल्या वैश्यवाणी सहकारी पतसंस्थेचे शिपाई कर्मचारी स्वप्निल सदानंद घाटगे (२१, राहणार फोंडाघाट) हा खारेपाटण एसटी बसस्थानक येथे असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत संस्थेने दिलेले चलन घेऊन पैसे काढण्यासाठी गेला होता. त्याने काउंटरवरून १ लाख रुपये घेतले. तो समोरील टेबलवर रक्कम मोजत असतानाच त्याच्यावर अगोदरच पाळत ठेवून बसलेल्या अज्ञात चोरट्याने त्याच्या हातातील रक्कम हिसकावून घेतली. यातील काही ५०० रुपयांच्या नोटा खोट्या असल्याचे भासवून त्याच्याकडील पैसे हात सफाईने व चलाखीने काढून घेत तेथून लगेच पळ काढला. आपली फसवणूक झाली ही बाब या कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच त्याने संबंधित बँक अधिकारी यांना सांगितले. मात्र, चौकशी करेपर्यंत चोरटा पळून गेल्याचे निदर्शनास आले.

चोरी प्रकरणात अनेकांचे हात असल्याचा संशय

घटनेची माहिती मिळताच खारेपाटण पोलिस दूरक्षेत्राचे अधिकारी उद्धव साबळे तसेच खारेपाटण येथील वैश्यवाणी सहकारी पतसंस्थेचे शाखा कर्मचारी, अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक बँक अधिकारी यांना सोबत घेऊन सीसीटीव्ही फुटेज चेक केले. मात्र, या चोरी प्रकरणात एकच चोरटा नसून अजूनही एक-दोन व्यक्ती सामील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्ती अनोळखी असल्याचे बोलले जात आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

१ लाख रुपये रकमेपैकी सुमारे २३५०० रुपये एवढी रक्कम अनोळखी अज्ञात चोरट्याने पसार केली असून या घटनेचा अधिक तपास पोलिस अधिकारी उद्धव साबळे व त्यांचे सहकारी करीत आहेत. दरम्यान, खारेपाटणमध्ये ऐन गणेश चतुर्थी सणाच्या अगोदरच अशा प्रकारे बँकेत चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी पुढील काळात जागरूकतेने राहिले पाहिजे व संशयित व्यक्ती आढळल्यास लागलीच पोलिसांच्या ताब्यात दिले पाहिजे.

Web Title: 23,000 rupees were stolen on the pretext of counting money, Kharepatan Sindhudurg district bank sensation of theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.