सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूस्खलन झालेल्या ‘त्या’ २० गावांवर प्रशासनाचा २४ तास वॉच
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 20, 2024 05:54 PM2024-05-20T17:54:57+5:302024-05-20T17:55:50+5:30
उपाययोजनेसाठी ८ कोटींची मागणी
मनोज वारंग
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत भूस्खलन झालेल्या गावांवर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यात २० गावे अशी आहेत की ज्या ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता आहे. यात ४६८ कुटुंबे आणि १९७७ व्यक्ती बाधित आहेत. पावसाळ्यात या ठिकाणावर जिल्हा प्रशासनाचे २४ तास लक्ष असणार आहे. आवश्यकता भासल्यास या कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येणार असून, यासाठी निवारा व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच, या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी शासनाकडे ८ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून, त्याला प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते. दरड कोसळणे, भूस्खलन आदी प्रकार घडतात. त्यामुळे आगामी पावसाळ्यात संभाव्य आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्यात गेली दोन वर्षे भूस्खलन होणारी गावे निश्चित केली आहे. यासाठी शासनाकडून जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. या कंपनीने २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये सर्व्हे करून भूस्खलन होणारी गावे निश्चित केली आहेत.
या गावांवर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यात २० गावे अशी आहेत की ज्या ठिकाणी भूस्खलन होते. यात ४६८ कुटुंबे आणि १९७७ व्यक्ती बाधित आहेत. या ठिकाणी पावसाळ्यात भूस्खलन झाल्यास तेथील नागरिकांना रेस्क्यू करणे, त्यांच्या राहण्याची, खाण्याची व्यवस्था नजीकच्या शाळा, समाजमंदिर आदी ठिकाणी करण्यात आली आहे. या गावांवर जिल्हा आणि तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन विभागाची २४ तास नजर असणार आहे. यावेळी संभाव्य भूस्खलन स्थिती निर्माण झाल्यास त्या ठिकाणी लागणारी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली.
ही आहेत भूस्खलन होणारी गावे
भूस्खलन होणाऱ्या गावांमध्ये कुडाळ तालुक्यात वेताळबांबर्डे तेलीवाडी, सरंबळ देऊळवाडी, चेंदवण नाईकनगर, वेलवाडी, हळदीचे नेरूर, शिवापूर गावठाणवाडी, वेंगुर्ला तालुक्यातील तुळस पलतड, वेशीवाडी, पाल, काथरवाडी, दाभोली, कोरजाई आनंदवाडी, सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गोटवेवाडी, असनिये कणेवाडी, दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे दापटेवाडी, मांगेली फणसवाडी, सासोली गावठाणवाडी, मालवण तालुक्यातील चिंदर तेराईवाडी, देवगड तालुक्यातील पेंढरी गावठाणवाडी, मुटाट घाडीवाडी, पोंभुर्ले मलपेवाडी रोड, मणचे या गावांचा समावेश आहे.
२० गावांतील ४६८ कुटुंबे बाधित
भूस्खलन होणाऱ्या २० गावांतील ४६८ कुटुंबे बाधित असून, यातील १९७७ व्यक्ती बाधित आहेत. यात कुडाळ ४१ कुटुंबे, वेंगुर्ला ३५, सावंतवाडी १८०, दोडामार्ग १५२, मालवण २, देवगड तालुक्यातील ५८ कुटुंबांचा समावेश आहे.
८ कोटी रुपयांची मागणी
जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या कंपनीने जिल्ह्यातील भूस्खलन होणारी गावे निश्चित करून या गावांमध्ये दरड सौमीकरण उपाययोजना आखण्यासाठी ८ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून, तो शासनाला सादर केला आहे. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निधीतून संरक्षक भिंत बांधणे, रस्ते दुरुस्त करणे आदी कामे केली जाणार आहेत.