खारेपाटण ब्रिजवर काम करणारे २४ मजूर कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 07:27 PM2021-06-10T19:27:14+5:302021-06-10T19:30:06+5:30
CoronaVirus In Sindhudurg : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत चालला असून बुधवारी रात्री दि.९ जून २०२१ रोजी कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी येथे हायवेच्या ब्रिजचे काम करणारे एकूण २४ मजूर एकावेळी पॉझिटिव्ह आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संतोष पाटणकर
खारेपाटण : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत चालला असून बुधवारी रात्री दि.९ जून २०२१ रोजी कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी येथे हायवेच्या ब्रिजचे काम करणारे एकूण २४ मजूर एकावेळी पॉझिटिव्ह आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या खारेपाटण येथे सुखनदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचे बाजूला नवीन पुलाच्या बांधणीचे काम के सी सी बिल्डकाँन कंपनीकडून करण्यात येत असून या पुलावर सध्या ५० पेक्षा अधिक संख्येने मजूर काम करीत आहेत. दरम्यान या मजुरापैकी एका मजुराचा स्वब तपासणी अहवाल खारेपाटण चेक पोस्ट येथे कार्यरत असलेल्या आरोग्य पथकाकडे रॅपिड टेस्ट केली असता दि.७/६/२०२१ रोजी पॉझिटिव्ह आला होता.
दरम्यान या मजुराच्या संपर्कात सलेल्या आणखी काही मजुरांचा स्वब तपासणी अहवाल तपासणी करण्याकरिता घेतला असता दि.८/६/२०२१ रोजी त्यांचे देखील अहवाल पॉझिटिव्ह आले. यानंतर खारेपाटण ब्रिज वर काम करणाऱ्या अजून २० मजुरांचा स्वब तपासणी करिता खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घेतला असता यापैकी १८ मजुरांचा स्वब तपासणी अहवाल दि.१८/६/२०२१ रोजी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आजपर्यंत के सी सी बिल्डकाँन कंपनीच्या खारेपाटण येथे ब्रिजवर काम करणाऱ्या एकूण २६ मजुरांचा स्वब तपासणी करण्याकरिता घेण्यात आला होता. यापैकी सुमारे २४ मजुरांचा स्वब तपासणी अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे या सर्व कोरोना बाधित मजुरांची रॅपिड तसेच आर टी पी सि आर अशा दोन्ही टेस्ट घेण्यात आल्या असून त्यांना पुढील उपचाराकरिता कणकवली येथील कोविड केअर सेंटर मध्ये पाठविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे खारेपाटण येथील बरीच वर्षे रखडलेल्या सुख नदीवरील पुलाचे काम सध्या जोरदार सुरू असून के सी सी बिल्डकाँन कंपनीचे मजूर येथे दिवस रात्र काम करीत आहेत.मात्र अचानक कोरोना सारख्या महामारीने के सी सी बिल्डकाँन कंपनीच्या मजुरांनाच गाठल्याने के सी बिल्डकाँन कंपनीच्या अन्य कामगारांमध्ये व्यवस्थपणामध्ये खळबळ माजली आहे.
दरम्यान खारेपाटण येथील नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता विनाकारण घराबाहेर पडू नये. व मास्क चा वापर करा गर्दी करू नका.आपल्या आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी केले आहे.