सीमकार्डचा २५ लाखांचा अपहार
By admin | Published: December 9, 2015 01:09 AM2015-12-09T01:09:12+5:302015-12-09T01:11:25+5:30
दोघांवर गुन्हा : दूरसंचारच्या कर्मचाऱ्याचा सहभाग
देवगड : देवगड बीएसएनएल कार्यालयामधील वरिष्ठ कार्यालयीन सहायक निशिकांत सावंत व खासगी अधिकृत सीमकार्ड व रिचार्ज वितरक उमेश केशव नेसवणकर यांनी मार्च ते जून २०१० या कालावधीमध्ये सीमकार्ड व रिचार्ज व्हाऊचरचा २५ लाख, २३ हजार, ३३४ रुपयांचा अपहार केला आहे. या अपहारप्रकरणी मंगळवारी देवगड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, निशिकांत सावंत व उमेश नेसवणकर यांनी त्यांना वरिष्ठ कार्यालयाकडून दिल्या गेलेल्या सिमकार्ड व रिचार्ज व्हाऊचर पैकी २५ लाख, २३ हजार, ३३४ रकमेचा धनादेश बीएसएनएलच्या बँक खात्यात जमा न करता त्या रकमेचा वरिष्ठ बीएसएनएल कार्यालयाकडे खोटा हिशेब दाखवून फसवणूक केली.
या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल झाला. दूरसंचारचे उपमंडल अधिकारी संभाजी सतरकर यांनीही देवगड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड करीत आहेत. (प्रतिनिधी)