हायस्पीड नौकांकडून २५ लाखांच्या जाळ्यांचे नुकसान, सिंधुदुर्गात संघर्ष भडकण्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 10:48 PM2017-10-29T22:48:23+5:302017-10-29T22:48:40+5:30
पारंपरिक मच्छिमारांच्या संघर्षमयी लढ्यानंतर राज्य शासनाने अतिरेकी मासेमारीवर निर्बंध आणणारा अध्यादेश पारित केला. त्यानंतर काही काळ पारंपरिक मच्छिमारांना अच्छे दिन दाखविणारा गेला.
मालवण - पारंपरिक मच्छिमारांच्या संघर्षमयी लढ्यानंतर राज्य शासनाने अतिरेकी मासेमारीवर निर्बंध आणणारा अध्यादेश पारित केला. त्यानंतर काही काळ पारंपरिक मच्छिमारांना अच्छे दिन दाखविणारा गेला. मात्र सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पुन्हा एकदा सैतानी पर्ससीन व हायस्पीड मासेमारीचा धुमाकूळ सुरू आहे. शनिवारी रात्री स्थानिक मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात टाकलेल्या जाळ्यांचे मलपी-कर्नाटक येथील हायस्पीड नौकांनी नुकसान केले आहे. यात सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले असल्याचे मच्छिमारांनी सांगितले. त्यामुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीवर अतिरेकी मासेमारीमुळे पुन्हा एकदा भर समुद्रात संघर्ष भडकण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, ‘लोकमत’मध्ये २२ आॅक्टोबर रोजी संडे स्पेशल या सदरात ‘सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पर्ससीन, हायस्पीड मासेमारीचा अतिरेक वाढतोय’ यावर विस्तृत लिखाण प्रसिद्ध करण्यात आले होते. परराज्यातील नौकांकडून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात घुसखोरी करून मासळीची लयलूट केली जात असल्याने स्थानिक मच्छिमारांनी पुन्हा एकदा कायदा हातात घेण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे मत्स्य विभागाकडून यावर काहीच कार्यवाही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्याच्या किनारपट्टीपासून बारा नॉटिकल मैल सागरी क्षेत्र स्थानिक मच्छिमारांसाठी राखीव ठेवण्यात आलेले असते. मात्र या राखीव जलधी क्षेत्रात परराज्यातील पर्ससीन तसेच हायस्पीड नौका खुलेआम घुसखोरी करत मच्छिमारांचा हक्काचा घास हिरावून नेत आहेत. आमदार वैभव नाईक यांनी भर समुद्रात जाऊन मत्स्य विभागाला कारवाई करण्यास भाग पाडले असतानाही त्यानंतर मत्स्य विभाग ढिम्मच असल्याने स्थानिक मच्छिमारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परराज्यातील नौकांची घुसखोरी सुरूच आहे. यावर मत्स्य विभाग कारवाई करण्यास अपयशी ठरला असून याचा फटका स्थानिक मच्छिमारांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. शनिवारी रात्री स्थानिक गिलनेट (न्हय) मासेमारी करणाºया मच्छिमारांनी समुद्रात टाकलेल्या जाळ्यांवरून मलपी-कर्नाटक येथील नौका गेल्याने मच्छिमारांची जाळी तुटून सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मच्छिमार नेते गोपीनाथ तांडेल यांनी दिली. यात सर्जेकोट, धुरीवाडा, दांडी येथील २५ मच्छिमारांची जाळी तुटून गेली.
मच्छिमारांची समुद्रात फिल्डींग
गतवर्षीप्रमाणे सर्जेकोट येथील स्थानिक मच्छिमार समुद्रात हायस्पीड बोटी पकडण्यासाठी शनिवारी रात्री रवाना झाले होते. मात्र स्थानिक मच्छिमार आपल्याला पकडण्यासाठी येत असल्याची टीप त्या हायस्पीड नौकांना मिळाल्याने स्थानिक मच्छिमारांना रिकाम्या हातानेच माघारी परतावे लागले. त्यामुळे किनारपट्टीवर धुमाकूळ घालणाºया नौकांना पकडण्यासाठी मच्छिमारांनी फिल्डींग लावली आहे. परराज्यातील नौकांमुळे मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान पाहता समुद्रात संघर्ष भडकणार हे निश्चित आहे. त्यामुळे मच्छिमारांकडून अघोरी कृत्य झाल्यास त्यास सर्वस्वी मत्स्य विभागाच जबाबदार राहील, असेही मच्छिमारांनी सांगितले.
चौकट
‘आचरा राडा’ प्रकरण पुन्हा पेटणार?
आचरा किनारपट्टीवर अनधिकृत पर्ससीन व मालवणातील पारंपरिक मच्छिमार यांच्यात संघर्ष पेटला होता. त्यानंतर पर्ससीन मासेमारीवर निर्बंध आल्याने पारंपरिक मच्छिमार शांत होते. मात्र पुन्हा एकदा स्थानिक परवानाधारक व अनधिकृत पर्ससीन नौकांनी पारंपरिक मच्छिमारांच्या मासेमारी क्षेत्रात घुसखोरी सुरू केली आहे. त्यामुळे आचरा, तोंडवळी किनारपट्टीवर पर्ससीन मासेमारी करणाºया काही बोटमालकांना पारंपरिक मच्छिमारांच्या सागरी क्षेत्रात मासेमारी करू नये, अन्यथा आम्ही कायदे हातात घेऊ, असा इशाराही मच्छिमारांनी दिला आहे. याची कुणकुण पोलीस प्रशासनाला लागली आहे.