गुन्हा नोंदविण्यासाठी २५ हजारांची मागणी

By admin | Published: November 15, 2015 12:38 AM2015-11-15T00:38:59+5:302015-11-15T00:38:59+5:30

गुरव कुटुंबाचा आरोप : पैसे घेतानाची चित्रफीत सादर; पोलिसांवर कारवाईची मागणी

25 thousand demand to register crime | गुन्हा नोंदविण्यासाठी २५ हजारांची मागणी

गुन्हा नोंदविण्यासाठी २५ हजारांची मागणी

Next

सावंतवाडी : दरोड्याच्या उद्देशाने घरात घुसलेल्या आरोपीच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर ती दाखल करून घेण्यासाठी पोलिसांनी २५ हजारांची लाच मागितल्याचा आरोप सिद्धी गुरव व त्यांचे पती विनायक गुरव यांनी केला आहे. यातील पैसे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव गवारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले असून, त्याची चित्रफीतही त्यांनी यावेळी सादर केली. तसेच पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत गुरव कुटुंबाने शनिवारी येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
१३ आॅगस्ट रोजी रात्री १२ वाजता पंधरा ते वीस जण जबरदस्तीने दादागिरी करून मुलांना ठार मारण्याच्या उद्देशाने सालईवाडा येथील आमच्या घरात घुसले. त्यांनी घरातील सुमारे दीड लाखाचे सामान चोरी करून नेले आहे. याबाबत आम्ही अनेकवेळा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. मात्र, त्यांनीही याची दखल घेतली नाही. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी आमच्याकडे उलट पैसे मागितले. जर पोलीस एखाद्या तक्रारदाराकडेच पैसे मागत असतील, तर सामान्य जनता कशी पोलीस ठाण्याची पायरी चढणार, असा सवाल गुरव कुटुंबाने उपस्थित केला.
घटनेच्या दिवशी सावंतवाडी पोलीस ठाण्यातील निसार तडवी, किरण कांबळी, ज्ञानदेव गवारी, सुभाष तेली व अन्य दोन पोलीस घरी आले होते. त्यांनीच दरोडे घालणाऱ्या नागरिकांविरुद्ध पोलिसांत तक्रार देऊनही आरोपींनाच साक्षीदार करून प्रकरण मिटवले. यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव गवारी यांनी तर गुन्हा दाखल करण्यासाठी आमच्याकडे २५ हजार रुपये मागितले. ते पैसे आम्ही गवारी यांच्याकडे सुपूर्द केले. तरीही अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नसून, पोलिसांनी आमच्या जवळून पैसे घेतले तसेच विरोधकांकडूनही घेतले आहेत, असा आरोप करीत पैसे घेतानाची चित्रफीत सादर केली. तसेच पैसे नेण्यासाठी गवारी हे आमच्या घरी आल्याचेही गुरव यांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी या प्रकरणातील सर्व पोलिसांची चौकशी करावी, अशी मागणी गुरव कुटुंबाने केली आहे. यासाठी आम्ही वेळ पडल्यास मंत्रालयासमोर उपोषण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

माझी तक्रार पोलिसांविरुद्ध असल्याने लाचलुचपतकडे गेलो नाही : गुरव
दरोड्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी २५ हजारांची मागणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव गवारींसह सहा पोलिसांनी केली आहे. पैसे घेताना गवारी हे एकटे चित्रफितीत दिसतात. जर ही तक्रार लाचलुचपतकडे गेली असती तर इतर पाच पोलीस सुटले असते. त्यामुळे ही तक्रार लाचलुचपतकडे दिली नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी या पोलिसांवर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.

Web Title: 25 thousand demand to register crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.