‘पर्ससीन’बंदीमुळे २५ हजार कुटुंबियांची उपासमार
By Admin | Published: March 7, 2016 11:18 PM2016-03-07T23:18:20+5:302016-03-08T00:34:23+5:30
बंदीचा परिणाम : बारा हजार खलाशीही बेकार होणार
रहिम दलाल-- रत्नागिरी शहरातील पर्ससीन नेट मासेमारीवर शासनाकडून बंदी घालण्यात आल्याने सुमारे १२ हजार खलाशांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. तर मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेल्या सुमारे २५ हजार कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा मच्छीमार संघाचे माजी संचालक व मच्छीमार नेते नूरमहंमद सुवर्णदुर्गकर यांनी दिली.
महाराष्ट्र सागरी अधिनियम १९८१ अंतर्गत पर्ससीन जाळ्याद्वारे मासेमारी करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. हा आदेश येऊन आज महिना उलटला. त्यामुळे या व्यवसायावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असलंबून असलेल्या इतर व्यवसायांवर याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. पर्ससीन मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात आल्याने यावर अवलंबून अन्य व्यावसायिकांवरही उपासमारीची वेळ आली असल्याचे सुवर्णदुर्गकर यांनी सांगितले.
बहुतांश पर्ससीन मच्छीमारांनी नौकांसाठी बँकाकडून, खासगी वित्त संस्थांकडून कर्ज घेतले आहे. त्यामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार जर का परवाने कमी केले अगर यापुढे मासेमारी बंद केली तर मच्छीमार देशोधडीला लागणार आहेत.
पर्ससीन जाळ्याद्वारे मासेमारी ही फक्त सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत करण्याचे दिलेले आदेश मच्छीमारांसाठी मारक ठरणार आहेत. वास्तविक ही मासेमारी नारळी पौर्णिमा ते मे महिनाअखेर या कालावधीत केली जाते. जिल्ह्यामध्ये सुमारे ४०० पर्ससीन नौका आहेत. यातील एका नौकेवर सुमारे २५ ते ३० खलाशी काम करतात. त्यामुळे एकूण १० ते १२ हजार खलाशी या नौकांवर काम करतात. पर्ससीन नेट मासेमारी व्यवसायावर जिल्ह्यातील सुमारे २५ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो, असे सुवर्णदुर्गकर यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)
१२ हजार खलाशांवर बेकारीची कुऱ्हाड.
रत्नागिरी जिल्हा मच्छीमार संघाचे माजी संचालक नुरमहंमद सुवर्णदुर्गकर यांच्याकडून माहिती
पर्ससीन नेट बंदीमुळे पूरक व्यवसायांवर परिणाम.
बंदी आदेशानंतर महिना उलटला.
लाखो रुपये उचल केलेल्या कर्जाचे हप्ते कसे फेडणार.