आंबोली घाटात थरारक पाठलाग करीत दारूसह २६ लाखांवर मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 04:44 PM2019-05-03T16:44:14+5:302019-05-03T16:45:36+5:30
सिंधुदुर्गनगरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने बुधवार १ मे रोजी रात्री ८ वाजता आंबोली मुख्य धबधब्याजवळ ...
सिंधुदुर्गनगरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने बुधवार १ मे रोजी रात्री ८ वाजता आंबोली मुख्य धबधब्याजवळ थरारक पाठलाग करीत अवैध गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कारवाई केली आहे.
या कारवाईत १० लाख २२ हजार ४०० रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूसह एकूण २६ लाख ५२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर अवैध दारू वाहतूक प्रकरणी संशयित राजकुमार बाबुराव चव्हाण (३८, रा. कोलगाव, सावंतवाडी) व गौरव चंद्रकांत वेंगुर्लेकर (२८, रा. वेंगुर्ले) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सावंतवाडी-बेळगाव या मार्गावरून अवैध गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूर उपायुक्त व सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ओरोस येथील भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक सत्यवान भगत, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे यांच्या टिमने बुधवारी सायंकाळपासून सावंतवाडी-बेळगाव रस्त्यावर सापळा रचला होता.
त्यानुसार रात्री ८ च्या सुमारास या पथकाने आंबोली घाटात स्वीफ्ट कार (एम.एच.०२, बी. डी. २९७९) आणि इनोव्हा कार (एम.एच. १४, एएन. ३०३३) या कारना या पथकाने थांबण्याचा इशारा केला होता. मात्र, त्या न थांबता सुसाट वेगाने पुढे निघून गेल्या. त्यामुळे या दोन्ही कारचा थरारक पाठलाग करून आंबोली मुख्य धबधब्याजवळ त्या अडविण्यात आल्या.
त्यांची तपासणी केली असता स्विफ्ट कारमध्ये ७५० मिमी बॉटल असलेले दारूचे ६० बॉक्स तर इनोव्हा कारमध्ये १८० मिमी बॉटल असलेले दारूचे ९२ बॉक्स असे १० लाख २२ हजार ४०० रुपये किमतीचे १५२ बॉक्स आढळून आहे. त्यामुळे १० लाख २२ हजार ४०० रुपये किमतीच्या दारूसह १६ लाख ३० हजारांची दोन वाहने असा एकूण २६ लाख ५२ लाख ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच गोवा बनावटीची बिगर परवाना अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी कारचालक राजकुमार बाबुराव चव्हाण व गौरव चंद्रकांत वेंगुर्लेकर यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच पुढील चौकशीसाठी ७ दिवसांत येथील कार्यालयात हजर रहावे, असे आदेशही देण्यात आले आहेत.
महिन्यात ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस येथील भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक सत्यवान भगत यांनी एप्रिल २०१९ मध्ये या भरारी पथकाचा पदभार स्वीकारला असून त्यांनी महिनाभराच्या आचारसंहिता कालावधीत १६ लाख ८३ हजारांची दारू व १९ लाख २० हजार रुपये किमतीची वाहने असा मिळून तब्बल ३६ लाख ३ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.