नौसेना दिनासाठी २६६ एसटी बुक, गावागावातून ग्रामस्थांना मालवणात आणण्याची व्यवस्था
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: December 2, 2023 07:30 PM2023-12-02T19:30:04+5:302023-12-02T19:30:25+5:30
प्रशासनाकडून अल्पोपहाराची व्यवस्था
मालवण : नौसेना दिनाचा कार्यक्रम ‘याची देहा याची डोळा’ पाहण्यासाठी एसटी प्रशासनाकडूनही नियोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध एसटी आगारांतून तब्बल २६६ एसटीच्या गाड्या तारकर्ली येथील सोहळ्यात सहभागी होण्यासाठी प्रवाशांना घेऊन येणार आहेत. शहरातील दांडी आवार याठिकाणी सर्वच्या सर्व गाड्या थांबविण्यात येणार असून, तेथून सर्व प्रवाशांना भव्य मंडपात बसून कार्यक्रम पाहण्याची संधी मिळणार आहे. सुमारे ५० हजार नागरिक या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता गृहित धरून प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
नौसेना प्रथमच आपल्या तळाच्या बाहेर जाऊन नौसेना दिन साजरा करत असल्याने या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम ‘न भुतो न भविष्यती’ असाच होणार असल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मालवण तालुक्यातून ४८ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व गाड्या रात्री वस्तीला त्या-त्या गावात जाणार असून, सकाळी लवकर प्रवाशांना घेऊन गाड्या मालवण शहरात दाखल होणार आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून गाड्या येण्यास सुरूवात होणार आहे. या सर्व गाड्या दांडी आवार याठिकाणी ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांनी दिली.
प्रत्येक गावात एसटी बस
जिल्ह्यातील प्रत्येक गावातील ग्रामस्थ हा सोहळा पाहण्यासाठी सहभागी होऊ शकतो. यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. सर्व २६६ गाड्यांतून प्रवाशांना आणण्यात येणार आहे. सर्व गाड्यांतील चालकांना गाड्या सोडून कुठेही जाऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिसांच्या सूचनेनुसार गाड्या पार्किंगमध्ये ठेवून त्याच ठिकाणी थांबून राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नौदल दिनाच्या कार्यक्रमात सर्वांना सहभागी होण्यासाठी एसटी प्रशासनही सहकार्यासाठी उतरल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रवाशांनी गाडी नंबर लक्षात ठेवावा
प्रवाशांनी ज्या गाडीतून आपण आलो, त्या गाडीचा नंबर लक्षात ठेवून पुन्हा त्याच गाडीत येऊन बसावे म्हणजे त्यांना पुन्हा त्यांच्या गावी जाताना कोणताही त्रास होणार नाही, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे. एसटी प्रशासनाकडून जास्तीत जास्त ग्रामस्थांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ४ डिसेंबर रोजी सकाळी गावातूनच गाडी सुटणार आहे. यामुळे ग्रामस्थांनी आपली गाडी थांबण्याच्या ठिकाणी उपस्थित राहून प्रवास करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून अल्पोपहार
तारकर्ली याठिकाणी दुपारी ४ वाजता प्रमुख कार्यक्रम सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी होणार असल्याने त्यांच्यासाठी दोन मोठे मंडप उभारण्यात आले आहेत. त्याठिकाणी त्यांना अल्पोपहार देण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात येत आहे.