"शिक्षकांची ३० हजार पदे भरणार, जुन्या पेन्शनवरही विचार"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 06:39 AM2023-02-17T06:39:16+5:302023-02-17T06:39:47+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिक्षकांसमोर घोषणा : सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) : राज्यात आता तुमच्या हक्काचे सरकार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी लक्ष केंद्रित करू. शिक्षण व्यवस्था दर्जेदार करण्यासाठी केंद्रप्रमुखाची रिक्त पदे भरण्याचे काम सुरू आहे. शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे लवकरच भरली जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे केली. शिक्षकांच्या जुन्या पेन्शनबाबत कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक मध्यम मार्ग काढू, असेही ते म्हणाले.
वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर, प्राथमिक शिक्षक समिती राज्याध्यक्ष उदय शिंदे, उपाध्यक्ष राजन कोरगावकर, आदी उपस्थित होते.
मातृभाषेतील शिक्षणावर भर
राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण सर्वेक्षणामध्येदेखील शिक्षकांनी मोठी झेप घेतली आहे. यात सरकारी शाळांचा वाटा खूप मोठा आहे. केंद्रीय शिक्षण
मंत्रालयाच्या कार्यमान प्रतवारी कामगिरी इंडेक्समध्ये एकूण १००० गुणांपैकी महाराष्ट्राला ९२८ गुण मिळाले आहेत. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतील शिक्षणावर भर दिला जाईल. इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
शिक्षकांसाठी टीआर लावण्याचा विचार
डॉक्टर जसे वाहनावर डीआर लावतात तसे शिक्षकांसाठी टीआर लावण्याबाबत विचार होईल. जेणेकरून शाळेत लवकर पोहोचता येईल. शिक्षकांवर जास्त बंधने लादली जाणार नाहीत.
केंद्रप्रमुखांची
रिक्त पदे भरणार
केंद्रप्रमुखाच्या सर्व रिक्त जागा शिक्षक भरती झाल्यानंतर सहा महिन्यांत भरल्या जातील. शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केला जाईल, असे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर म्हणाले.