शेवाळेवाडीत तीस वर्षांनी पोहोचली एसटी..!
By admin | Published: December 24, 2014 09:55 PM2014-12-24T21:55:51+5:302014-12-25T00:16:42+5:30
पाठपुराव्याला यश : ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण
उंडाळे : गाव तेथे एस. टी. ही शासनाची योजना आहे. मात्र शेवाळेवाडी-येवती गावात १९८३ सालानंतर तब्बल ३० वर्षांनी एस. टी. पोहोचली. ग्रामस्थांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. गावात पोहोचलेल्या एस. टी. चे ग्रामस्थांनी स्वागत केले.
शेवाळेवाडी-येवती हे कऱ्हाड तालुक्याच्या पश्चिमेला डोंगरङ्कमाथ्यावर वसलेले गाव आहे. या गावात दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्या पुढाकारातून १९८३ साली एस.टी. चालू झाली. मात्र, कालांतराने ती बंद झाली. या गावातील लोक पायी ५ किलोमीटर अंतर चालत ये-जा करत होते. गावाला पुन्हा एस. टी. चालू करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रयत्न केले; पण त्यांना त्यामध्ये अपयश आले. कालांतराने ग्रामस्थांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचे हाल थांबविण्याची विनंती केली. त्यासाठी ग्रामस्थांनी इंद्रजित चव्हाण यांची भेट घेतली. दोन दिवसांपुर्वी शेवाळेवाडी-येवती ही एस. टी. गावात पोहोचली. एस. टी. पाहताच ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी एस. टी. चे पुजन करून स्वागत केले.
सकाळी ७.३० आणि रात्री ७.३० वाजता अशा एस. टी.च्या दोन फेऱ्या होणार आहेत. एस. टी.च्या स्वागत प्रसंगी सरपंच सदाशिव शेवाळे, जयवंत शेवाळे, शंकर महिंंदकर उपस्थित होते. (वार्ताहर)
शेवाळेवाडी गावाला एस. टी. नसल्यामुळे ग्रामस्थांसह विशेष करून विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. अनेक किलोमिटरची पायपीट करून त्यांना शिक्षणासाठी जावे लागत होते. मात्र, एस. टी. पुन्हा सुरू झाल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या वेळ आणि पैशाची बचत होणार आहे.
- सदाशिव शेवाळे, सरपंच