३०० हेक्टर भातशेती पाण्याखाली

By admin | Published: August 5, 2016 11:39 PM2016-08-05T23:39:31+5:302016-08-06T00:21:04+5:30

जिल्ह्यात संततधार सुरुच : वेंगुर्ले, वैभववाडीला सर्वाधिक फटका

300 hectares of paddy under water | ३०० हेक्टर भातशेती पाण्याखाली

३०० हेक्टर भातशेती पाण्याखाली

Next

ओरोस : जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीनाले दुथडी भरून वाहू लागले असून पाणी नदीपात्राबाहेर पडून भात शेतीत घुसले आहे. अशी एकूण ३०० हेक्टर भातशेती पाण्याखाली गेली आहे. त्यात वेंगुर्ले आणि वैभववाडी तालुक्यातील भात शेतीला जास्त झळ बसली आहे. सध्या ही पाऊस पडत असल्याने हे पाणी भातशेतीतून ओसरू शकत नाही. त्यामुळे भात शेती बाद होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात १ जूनपासून मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला. १९ जून पासून मान्सून दाखल झाला. या पावसाचे आगमन झाल्यापासून तो अविश्रांत कोसळत आहे. मागच्या दोन महिन्यातच पावसाने गतवर्षीची सरासरी गाठली. मात्र या सर्वात शेतकरी बांधवांची भातशेतीची लावणी करताना कोणतीही अडचण आली नाही. त्यामुळे दरवर्षी नागपंचमी पर्यंत किंवा त्यानंतर उशीरापर्यंत भातशेती लागवडीची असणारी धावपळ यावर्षीतरी किमान थांबली व वीस दिवस अगोदरच भातशेतीची लावण पूर्ण झाली. भातशेतीची लावणी पूर्ण झाली असली तरीही, सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या पीकावर विपरित परिणाम होत आहे. शेकडो एकर शेती, पाण्याखाली गेली आहे. नदीनाल्यांच्या किनाऱ्यावर असलेली ३०० हेक्टर पीके यावेळी पाण्याखाली गेली आहेत. गेल्या १५ ते २० दिवसांपेक्षा अधिक पाणी साचल्याने काही दिवसानंतर भात शेतीचे नुकसान होणार आहे. हे भात क्षेत्र खराब होऊन शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना याबाबत लेखी पत्र पाठवले आहे. पाण्याखाली गेलेल्या भातशेतीची पंचयादी घालावी. ही शेती बाद झाल्यास पंचनामे शासनाला सादर करून नुकसान भरपाई मागता येईल, असे त्यांनी या पत्रात म्हटले
आहे. (वार्ताहर)

पावसामुळे होणार नुकसान
याबाबत कृषी विभागाचे सांख्यिकी अधिकारी अरूण नातू म्हणाले की, गेल्या १५ दिवसांपासून भात शेती पाण्याखाली गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर भातशेतीचे भवितव्य निश्चितच धोक्यात येणार आहे.
अळ्यांपासून काळजी घ्या
भात पीकांवर यावर्षी पाने गुंडाळणारी अळी किंवा निळे भुंगरे या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणास कृषी विभागाशी किंवा तज्ज्ञांशी संपर्क साधून औषधांची फवारणी करावी असे आवांहन कृषी विद्यालय केंद्राच्या नोडल आॅफिसर यांनी केले आहे.

Web Title: 300 hectares of paddy under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.