सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापही ३१० मुले शिक्षण प्रवाहापासून दूर

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 19, 2024 06:55 PM2024-06-19T18:55:10+5:302024-06-19T18:56:23+5:30

मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याची कसरत जिल्हा परिषद प्रशासनाला करावी लागणार 

310 children are still out of education stream In Sindhudurg district | सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापही ३१० मुले शिक्षण प्रवाहापासून दूर

संग्रहित छाया

मनोज वारंग

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पट नोंदणी सर्वेक्षणानुसार दाखल पात्र ६ हजार ०२३ मुलांपैकी ५ हजार ७१३ मुले पहिलीत दाखल झाली आहेत. अद्यापही ३१० मुले दाखल झालेली नसून या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याची कसरत जिल्हा परिषद प्रशासनाला करावी लागणार आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांवर देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने दरवर्षी फेब्रुवारी, मार्च महिन्यात मराठी शाळांच्या शिक्षकांकडून पहिलीत दाखल होऊ शकणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण केले जाते. तसेच या सर्व मुलांना शाळा प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात.

यावर्षी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात एकूण ६०२३ एवढी मुले पहिलीत दाखल पात्र असल्याची बाब समोर आली होती. ही सर्व मुले जिल्हा परिषद शाळेत दाखल व्हावीत यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांनी विशेष उपक्रम राबवत गुढीपाडव्यापासूनच पहिलीत प्रवेश घेण्यास सुरुवात केली होती. या उपक्रमात दाखल पात्र मुलांपैकी ५० टक्के मुलांचे प्रवेश नक्की झाले होते, तर उर्वरित मुलांना ३१ जुलैपर्यंत शाळेत प्रवेश घेता येणार आहे.

२८३५ मुलगे, २८७८ मुली

जास्तीत जास्त मुले मराठी शाळेत यावीत, यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यानंतर मुलांच्या शाळा प्रवेशाची माहिती घेतली असता जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधून मिळून एकूण ६ हजार ०२३ दाखलपात्र मुलांपैकी आतापर्यंत ५७१३ मुले दाखल झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामध्ये २८३५ मुलगे आणि २८७८ मुलींचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेला करावी लागणार कसरत

सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार अद्याप ३१० मुले शाळेत दाखल होणे बाकी आहे. यामध्ये १६९ मुले आणि १४१ मुलींचा समावेश आहे. जुलै अखेरपर्यंत या मुलांना शाळेत दाखल होण्याची संधी आहे. त्यामुळे अद्याप शिक्षण प्रवाहात न आलेली मुले नेमकी कुठे आहेत हे शोधून काढावे लागणार आहे, तसेच या मुलांना शाळेत आणण्याचे प्रयत्न त्या -त्या परिसरातील शाळा मुख्याध्यापकांना करावे लागणार आहेत. तसेच आपली शाळा सोडून अन्यत्र दाखल होणाऱ्या मुलांची माहिती शासनाला द्यावी लागणार आहे.

तालुकानिहाय दाखल मुले

तालुका - दाखल - पात्र दाखल
देवगड - ८२१.- ७४८
दोडामार्ग - ४०० - ३९७
कणकवली - १०१७ - १०१७
कुडाळ ११७८ - ११३४
मालवण - ७०८ - ६९४
सावंतवाडी - १००२ - ९०५
वैभववाडी - २८७ - २७८
वेंगुर्ला - ६१० - ५४०

Web Title: 310 children are still out of education stream In Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.