३१३० मतदान यंत्र, ११ हजार कर्मचारी
By admin | Published: February 20, 2017 11:54 PM2017-02-20T23:54:53+5:302017-02-20T23:54:53+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक : मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी
रत्नागिरी : परिषदेचे ५५ गट आणि पंचायत समितीच्या ११० गणांसाठी उद्या २१ रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, जिल्ह्यातील एकूण १५६५ मतदान केंद्रांवर प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण ३१३० इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रांसह ११,१०९ अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रावर आज (सोमवारी) रवाना झाले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मंगळवार (दि. २१) रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हाभरात एकूण १० लाख ७१ हजार ८१५ इतके मतदार आहेत. त्यापैकी पुरूष ५ लाख ९४ हजार १०, तर महिला मतदारांची संख्या ५ लाख ६२ हजार ३९८ इतकी आहे.
यासाठी १५६५ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समितीसाठी स्वतंत्र अशी प्रत्येकी दोन मतदान यंत्र वापरावी लागणार आहेत. त्यामुळे मतदान केंद्राच्या दुप्पट ३१३० इतकी यंत्र लागणार आहेत. यंदा प्रथमच निवडणुकीसाठी दोन स्वतंत्र मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत.
तसेच एखाद्या यंत्रांमध्ये ऐनवेळी बिघाड झाल्यास पर्यायी १० टक्के मतदानयंत्र तयार ठेवावी लागणार आहेत. उद्या मतदान होणार असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर चार मतदान अधिकारी, शिपाई व पोलीस असे सहा कर्मचारी आज सकाळी आपापल्या केंद्रावर मतदानयंत्रासह दाखल झाले आहेत.
यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या १४२ गाड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येकी १० मतदान केंद्रासाठी एक असे १६६ क्षेत्रिय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे सर्व कर्मचारी आणि अधिकारी सोमवारी सकाळी त्या त्या मतदान केंद्रावर रवाना झाले. जिल्ह्यात सर्व एस. टी. दुपारपर्यंत मतदान केंद्रावर पोहोचल्या.
उद्या मंगळवारी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया होणार आहे. गुरूवार, २३ रोजी सकाळी मतमोजणी हाती घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)