३२ लाखांचे अंदाजपत्रक मंजूर
By admin | Published: December 17, 2014 09:56 PM2014-12-17T21:56:07+5:302014-12-17T22:53:56+5:30
वेंगुर्ले पंचायत समिती सभा : दीपक केसरकरांच्या अभिनंदनाचा ठराव
वेंगुर्ले : वेंगुर्ले पंचायत समितीच्या सन २०१४-१५ च्या ३२ लाख रुपयांच्या सुधारीत अंदाजपत्रकास आणि सन २०१५-१६ च्या २० लाखाच्या मूळ अंदाजपत्रकास पंचायत समितीच्या मासिक सभेत मंजुरी देण्यात आली.
वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा मंगळवारी पंचायत समिती सभापती सुचिता वजराठकर यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै सभागृहात झाली. यावेळी उपसभापती स्वप्निल चमणकर, पंचायत समिती सदस्या चित्रा कनयाळकर, उमा मठकर, सुनील मोरजकर, अभिषेक चमणकर, प्रणाली बंगे, सावरी गावडे, गटविकास अधिकारी टी. बी. जाधव, गटशिक्षणाधिकारी वंदना वळवी, बाबली वायंगणकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी सामंत तसेच सर्व खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला आमदार दीपक केसरकर यांची ग्रामीण व वित्त राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. सन २०१४-१५ च्या सुधारीत अंदाजपत्रकामध्ये इमारत व दळणवळणासाठी १ लाख, शिक्षक व क्रीडा २ लाख, कृषी विभाग ५ लाख ५० हजार, पशुसंवर्धन ५० हजार, समाजकल्याण ६ लाख २१ हजार, महिला व बालकल्याण २ लाख ७० हजार, संकीर्णमध्ये ६ लाख ८४ हजार, आरोग्य व टोकण खर्च २५ हजार, भांडवली खर्च ४ लाख ५० हजार व महसुली शिल्लक ५० हजार असे एकूण ३२ लाखांमध्ये विभाजन करण्यात आले.
सन २०१५-१६ च्या मूळ अंदाजपत्रकामध्ये शिक्षण व क्रीडा १ लाख, दळणवळणासाठी ३ लाख, आरोग्यासाठी ५ लाख, कृषी विभागासाठी ५ लाख, समाजकल्याण व अपंग कल्याणासाठी ४ लाख १४ हजार, संकीर्णमध्ये २ लाख, महिला व बालकल्याण १८ हजार, महसुली खर्च १ लाख ७५ हजार, भांडवली खर्च २ लाख असे एकूण १९ लाख ५० हजारांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले.
तालुक्यात काही शाळांमध्ये शिक्षक जास्त आहेत, काही शाळांमध्ये कमी आहेत. जास्त असणाऱ्या शाळांमधील शिक्षकांंची बदली आवश्यक असलेल्या शाळांमध्ये करावी, असे पुरुषोत्तम परब यांनी सांगितले.
तसेच या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. गटविकास अधिकारी टी. बी. जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
नष्ट झालेल्या घरांच्या सर्व्हेचे आदेश
नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसाने आंबा व काजू शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून अशा शेतकऱ्यांना शासनाकडून ५० हजाराची तत्काळ आर्थिक मदत मिळावी, असा प्रस्ताव माजी सभापती अभिषेक चमणकर यांनी ठेवला. उभादांडा ग्रामपंचायतीमध्ये जी घरे नष्ट झाली आहेत, अशा घरक्रमांकांची घरपट्टी आकारली जात आहे. पंचायत समितीने संंबंधित विभागाला अशा नष्ट झालेल्या घरांचा सर्व्हे करण्याचे आदेश द्यावेत, असेही चमणकर यांनी सांगितले. पंचायत समिती सदस्य सुनील मोरजकर यांनी आसोली गावातील वीज वारंवार खंडीत होत असल्याचे यावेळी उपस्थित असलेल्या वीज विभाग अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.