३२ हजार विद्यार्थी देणार १२ वीची परीक्षा
By admin | Published: February 26, 2017 12:07 AM2017-02-26T00:07:41+5:302017-02-26T00:07:41+5:30
सामान्यज्ञान विषयाची प्रथमच आॅनलाईन परीक्षा : २१ परीरक्षक केंद्र तर ५९ परीक्षा केंद्र कार्यान्वित
टेंभ्ये : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मंगळवार, दिनांक २८ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. कोकण विभागीय शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ३२,७४३ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत.
कोकण विभागीय शिक्षण मंडळाने या परीक्षेसाठी आवश्यक ती सर्व पूर्वतयारी पूर्ण केली असल्याचे कोकण विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शंकुतला काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांमध्ये २१ परीरक्षक केंद्र तर ५९ परीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. यावर्षी प्रथमच राज्य मंडळाकडून सामान्यज्ञान या विषयाची परीक्षा आॅनलाईन घेतली जाणार आहे.
कोकण विभागीय शिक्षण मंडळांतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश होतो. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला बसणाऱ्या एकूण ३२,७४३ विद्यार्थ्यांपैकी रत्नागिरी जिल्ह्यातून २१,३६२ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ११,३८१ इतके विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
विद्यार्थ्यांना सुरळीतपणे परीक्षा देता यावी, यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ३६ परीक्षा केंद्र व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये २३ परीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. एकूण प्रविष्ठ विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेतून ९,५१४, शास्त्र शाखेतून ८,३४०, वाणिज्य शाखेतून १३,१४९ तर एमसीव्हीसीमधून १,७४० इतके विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेचे नियंत्रण करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांमध्ये २१ परीरक्षक केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात १२ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ परीरक्षक केंद्रांचा समावेश आहे. यावर्षी प्रथमच राज्य मंडळाकडून सामान्यज्ञान या विषयाची परीक्षा आॅनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.
कोकण विभागीय मंडळांतर्गत जामगे व आंबोली या केंद्रांचे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेसाठीदेखील यावर्षी भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली होती. तसेच आयटी विषयासाठी बहिस्थ परीक्षक नियुक्त करण्यात आला होता. बारावीची परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी कोकण मंडळाने विशेष लक्ष दिले आहे. परीक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या केंद्रांवर मंडळाची बारीक नजर असून, कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. (वार्ताहर)
कॉपीमुक्त अभियानासाठी मेळावा
१० वी, १२ वीच्या परीक्षा गैरमार्गमुक्त व निकोप वातावरणात पार पडाव्यात, यासाठी अध्यक्षा डॉ. शंकुतला काळे, सचिव आर. बी. गिरी, सहसचिव किरण लोहार व सहाय्यक सचिव चंद्रकांत गावडे यांनी प्रत्येक तालुक्यात आदर्श नमुना मेळावे घेतले. या मेळाव्यात दिलेल्या माहितीनुसार उर्वरित प्रत्येक शाळांमध्ये मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यांतील विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे कॉपीमुक्त अभियाना संदर्भात समुपदेशन करण्यात आले.
गैरमार्ग रोखण्यासाठी ‘भरारी पथके’
कोकण विभागीय शिक्षण मंडळाकडून परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी विविध भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. यामध्ये दोन्ही जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक व निरंतर, डाएट प्राचार्य, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, महिला भरारी पथक, शिक्षण उपसंचालक, विभागीय व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांद्वारे परीक्षेवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे.
१० वी व १२ वीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणताही मानसिक ताण न घेता मुक्त वातावरणात ही परीक्षा द्यावी. विशेषत: परीक्षा काळात पालकांनी विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक काळजी घेणे गरजेचे आहे. आवश्यक असल्यास विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे. पालकांनी विद्यार्थ्यांवर आपली अपेक्षा लादू नये. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांवर कोणताही ताण येणार नाही, याची केंद्र संचालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन कोकण शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शंकुतला काळे यांनी केले आहे.
- डॉ. शंकुतला काळे