सावंतवाडीत वर्षभरात ३५ चोऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2015 12:52 AM2015-06-16T00:52:12+5:302015-06-16T00:52:12+5:30
एकालाही अटक नाही : पोलिसांची अकार्यक्षमता उघड, नागरिकांचा विश्वास उडाला
प्रसन्न राणे / सावंतवाडी
शहरात चोरांच्या उच्छाद वाढला असून येथील नागरिकांमध्ये सध्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे एका वर्षात शहरात सुमारे ३५ चोऱ्या झाल्याअसून आतापर्यंत पोलीसांना एकाही आरोपीस अटक करण्यात यश आले नाही. पोलीसांची ही कुचकामी यंत्रणा पाहून येथील चोरही आता निर्ढावलेले आहे. एकाच दिवशी एक नव्हे, तर सलग पाच-सहा फ्लॅट फोडून लाखांचा मुद्देमाल लंपास करत आहेत. यामुळे नागरिकांचाही पोलीसांवरील विश्वास उडाला असून चोरी झाली असली तरी काहीजण तक्रार नोंदीवण्यास पुढे येत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
गेल्या दोन रात्री घडलेल्या चोरांचा उच्छादांनी शहरवासी भयभीत झाले आहेत. शनिवारी (दि. १३) मध्यरात्री व रविवारी (दि.१४) मध्यरात्री चोरांनी एकुण ९ ठिकाणचे बंद फ्लॅट व दुकाने फोडून एकुण १० लाखांचा माल लंपास केला. पोलीसांनी या घटनेकडे गांभीऱ्यांने पाहणे आवश्यक आहे.
पेट्रोलिंग नावापुरतेच
शहरातील गस्तीच्यावेळी मोठी पोलीस व्हॅनचा वापर केला जातो. ही व्हॅन गल्ली-बोळातून कधीच फिरत नाही. काही मुख्य ठिकाणीच उभी असते. पोलीस व्हॅनमधून उतरून भरकटणाऱ्या नागरिकांची साधी चौकशीदेखील करताना दिसत नाही. हे चित्र बदलायला हवे.
गस्तीला सहाच पोलीस
शहराचा विस्तार व लोकसंख्या पाहता रात्रीच्या गस्तीला असणारे सहा पोलीस ही संख्या खूपच कमी आहे. हे पोलीस शहरातील मुख्य ठिकाणीच गस्त घालत असतात व गल्ली-बोळातील नागरिकांची सुरक्षा टांगणीवर असते.
मंगळवारी चोरीच्या घटना अधिक
मंगळवार हा शहराचा आठवडयाचा बाजाराचा दिवस आहे. या दिवशी महिलांच्या गळ्यातील सोने पळविण्याचे व पाकिट मारण्याच्या घटना अधिक घडतात. याकडे पोलीस यंत्रणेचे कायमच दुर्लक्ष राहिले आहे. पोलीस बंदोबस्तास एकच पोलीस असल्याकारणाने चोरीचे प्रकार होताना दिसते.
चोरीच्या घटनास्थळी काही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज चोरट्यांचे सापडूनही अद्यापही एकाही चोराला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही.
आंबोली येथे कॉन्स्टेबल संजय खाडे यांच्या चानाक्षपणामुळे २९ नोव्हेंबर २०१४ रोजी चोरट्यांची टोळी पकडण्यात पोलीसांना यश आले होते. दोघे संशयित सायकलवरून एक पिशवी घेऊन जात होते. त्यावेळी कॉन्स्टेबल खाडे यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्या पिशवीत देवळातील घंटा सापडल्या. पोलीसी दणका दिल्यानंतर त्यांनी आणखी काही चोरांचे नावे सांगितले.
पोलीस संख्या अपुरी
सावंतवाडी तालुक्याची २५००० लोकसंख्या असून यांच्या सुरक्षेसाठी एक पोलीस निरीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षक, तीन पोलीस हेडकॉन्स्टेबल व ८२ पोलीस कर्मचारी कार्यरत आहे.
याच ठाण्याकडे माजगाव, कोलगाव, आरोंदा, सातार्डा, तळवडे, मळगाव, आंबोली, कलंबिस्त गावांचीही सुरक्षा आहे. या बंदोबस्तासह सावंतवाडीच्या १५००० लोकसंख्येच्या सुरक्षेसाठी पोलीस संख्या अपूरी आहे.
४आतापर्यंत झालेल्या चोरीप्रकरणी कधीही ठसेतज्ज्ञ व श्वानपथकास यश मिळालेले नाहीच. श्वान हे नेहमीच चोरीच्या घटनास्थळापासून काही अंतरावर घुटमळतच राहिले आहेत.