सिंधुदुर्गनगर जिल्ह्यात ३५८ कुपोषित बालके--महिला व बालविकास समिती सभेत माहिती उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 10:27 PM2017-09-27T22:27:49+5:302017-09-27T22:30:48+5:30
सिंधुदुर्गनगरी : कुपोषण मुक्तीसाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यानेही कुपोषणमुक्त जिल्हा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्गनगरी : कुपोषण मुक्तीसाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यानेही कुपोषणमुक्त जिल्हा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. असे असले तरी जिल्ह्यात ३५८ कुपोषित बालके असून, यात ३२ ही तीव्र कुपोषित (सॅम), तर ३२६ बालके ही कुपोषित (मॅम) असल्याची धक्कादायक माहिती बुधवारी महिला व बालविकास समिती सभेत उघड झाली. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषणमुक्तीचे स्वप्न भंगले आहे.
गरोदर मातांना पुरेसा पोषण आहार न मिळणे, तसेच लहान मुलांना योग्य तो आहार न मिळाल्याने त्यांच्या वजनात घट होऊन ही बालके कुपोषित श्रेणीत जातात. देशातील कुपोषण दूर करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना आखल्या जात आहेत. राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण कमी असले तरी जिल्हा प्रशासन आणि शासन लहान मुलांना पोषण आहार देऊन कुपोषणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. याशिवाय जिल्हा परिषदेनेही जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प केला आहे.
त्यासाठी जिल्हा परिषद महिला व बालविकास विभाग आपले सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. अंगणवाड्यांमधून या लहान मुलांना पोषण आहार दिला जात आहे.
असे असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५८ कुपोषित बालके असल्याची माहिती बुधवारी महिला व बालविकास समिती सभेत देण्यात आली. यात ३२ बालके ही ‘सॅम’ श्रेणीत तर ३२६ ही ‘मॅम’ श्रेणीत आहेत. यात वैभववाडीमध्ये ‘मॅम’ श्रेणीत चार, कणकवलीमध्ये ‘सॅम’ श्रेणीत पाच व ‘मॅम’ श्रेणीत ३२, देवगडमध्ये ‘सॅम’ श्रेणीत पाच व ‘मॅम’ श्रेणीत आठ, मालवणमध्ये ‘सॅम’ श्रेणीत सहा व ‘मॅम’ श्रेणीत ३७, कुडाळमध्ये ‘सॅम’ श्रेणीत सात, तर ‘मॅम’ श्रेणीत ९१, वेंगुर्लेत ‘सॅम’ श्रेणीत तीन, तर ‘मॅम’ श्रेणीत ३७, सावंतवाडीमध्ये ‘सॅम’ श्रेणीत चार, तर ‘मॅम’ श्रेणीत ७० आणि दोडामार्ग तालुक्यात ‘सॅम’ श्रेणीत दोन तर ‘मॅम’ श्रेणीत २१ बालके आहेत. या ३५८ मुलांचे श्रेणी संवर्धन करण्यासाठी महिला व बालविकास आणि आरोग्य विभागच्या मदतीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती बुधवारी महिला व बालविकास समिती सभेत देण्यात आली.
१७ मुलांच्या श्रेणीत सुधारणा : डॉ. साळे
जिल्ह्यातील कुपोषित मुलांच्या वय, वजन, उंचीनुसार त्यांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. या मुलांचे श्रेणी संवर्धन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पुनर्वसन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रात संबंधित मुलांना आणून त्यांना योग्य तो पोषण आहार देऊन त्यांचे श्रेणी संवर्धन केले जात आहे. या केंद्रात दाखल झालेल्या १७ मुलांच्या श्रेणीत सुधारणा होत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी सभेत दिली. तसेच या केंद्रातून घरी गेल्यानंतर मातांनी मुलांना कोणता आणि कसा आहार द्यावा, याबाबत मार्गदर्शनही केले जात असल्याचे डॉ. साळे यांनी स्पष्ट केले.