किनारपट्टीवर ३६ तास सागर सुरक्षा कवच
By Admin | Published: November 17, 2015 10:22 PM2015-11-17T22:22:47+5:302015-11-18T00:05:33+5:30
मोहिमेस आजपासून सुरुवात : मालवण किनारपट्टी व सागरी मार्ग सील
मालवण : महाराष्ट्र किनारपट्टीवर सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी सुरक्षा दलातर्फे राबवण्यात येणारी सागर सुरक्षा कवच मोहीम सिंधुदुर्ग किनारपट्टीवर बुधवार १८ रोजी सकाळी ६ ते गुरुवारी सायंकाळी ६ या ३६ तासाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेसाठी मालवण, आचरा येथील पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. ८ अधिकाऱ्यांसह ९० कर्मचाऱ्यांची टीम मालवण किनारपट्टी व सागरी मार्ग सील करणार आहेत. दोन टॉवरच्या माध्यमातूनही लक्ष ठेवले जाणार असून दिवसरात्र पोलिसांची गस्त व नाका बंदी याठिकाणी राहणार आहे.
सुरक्षेचे प्रात्यक्षिक म्हणून ही मोहीम वर्षातून दोन ते तीन वेळा राबवली जाते. या मोहिमेत कोस्टगार्ड, बंदर, नेव्ही व महसूल तसेच पोलिसांची रेड टीम आणि ब्लू टीम या मोहिमेत सहभागी होतात. देशातील सर्वाधिक मोठ्या अशा दहशतवादी हल्ल्यांपैकी असा २६/११ चा हल्ला समुद्रीमार्गे दहशतवाद्यांनी घडवला. त्यानंतर किनारपट्टीवरील सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेण्यासाठी ही मोहीम राबवली जाते.
मालवण प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केराम व आचरा सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टीम सज्ज झाली आहे. (प्रतिनिधी)
सहकार्याचे आवाहन
४किनारपट्टीवर तसेच रस्त्या-रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे.
४तोंडवली व आचरा किनारपट्टीवर टॉवर, समुद्रात स्पीड बोट तसेच जीप, मोटारसायकल गस्त राहणार आहे.
४नाकाबंदी दरम्यान वाहनचालकांनी सहकार्य करावे, असेही आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले
आहे.
पोलिसांचीच रेड टीम ही ब्लू टीमची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न करणार आहे. मालवण तालुक्यात ८ अधिकारी व ९० पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत.