३६३ धोकादायक शाळांमध्ये विद्यार्थी गिरवताहेत शिक्षणाचे धडे
By admin | Published: June 3, 2016 12:34 AM2016-06-03T00:34:03+5:302016-06-03T00:44:26+5:30
जिल्हा परिषद शाळांना कोणी वालीच नाही : दुरूस्तीचा अहवाल ३ वर्षांपासून पडून, मंजुरी मिळूनही निधीअभावी एकही शाळेची दुरूस्ती नाही
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदांच्या शाळांना कोणी वालीच उरला नसल्याचे आजच्या सभेत उघड झाले. गेल्या तीन वर्षांपासून तब्बल ३६३ शाळांची दुरुस्ती अत्यावश्यक असल्याचे अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरावर पाठविण्यात आला. त्यातील शाळांना दुरुस्तीसाठी मंजुरीही मिळाली. मात्र निधीअभावी यातील एकाही शाळेची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे या शाळांमध्ये मुलांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा प्रकार समोर आला आहे.
जिल्हा परिषद शिक्षण समितीची खास सभा सभापती आत्माराम पालेकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी सदस्य विष्णू घाडी, स्वीकृत सदस्य संजय बगळे, संतोष पाताडे, फादर लोबो, समिती सचिव तसेच शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या शेकडो शाळा या दुरुस्तीच्या गर्तेत सापडल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून २२७ शाळांच्या दुरुस्तीच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. मात्र निधीअभावी यातील एकही काम सुरु होऊ शकलेले नाही. तर यावर्षी नव्याने १३६ शाळा दुुरुस्तीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत अशी माहिती शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर यांनी दिली.
गेली तीन वर्षे मुलांना त्या धोकादायक शाळांमधून शिक्षण घ्यावे लागत असून एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
शाळांच्या या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे निधी नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे यावर्षीसुद्धा विद्यार्थ्यांना याच धोकादायक ३६३ शाळांमधून शिक्षणाचे धडे गिरवावे लागणार आहेत. आता पावसाळा सुरू होत असून यासर्व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून अभ्यास करावा लागणार
आहे. (प्रतिनिधी)
१४८0 संगणक : ८४२ सुस्थितीत, ६३८ बंदावस्थेत
जिल्हा परिषद शाळांमधील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे घेता यावे यासाठी सर्व शिक्षा अभियानामधून २००३ मध्ये १४८० संगणक शाळांना पुरविण्यात आले होते. ही निश्चितच कौतुकाची बाब होती. मात्र सद्यस्थिती पाहता यातील ८४२ संगणक सुस्थितीत असून ६३८ संगणक बंदावस्थेत आहेत. या संगणकांचा मदरबोर्ड, हार्डडिस्क खराब असल्याने व त्यासाठी येणारा खर्च परवडणारा नसल्याने हे संगणक बंदावस्थेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रत्नाकर धाकोरकर यांनी दिली.