लोटेत वायूगळती ३९ जणांना बाधा
By admin | Published: March 24, 2017 11:31 PM2017-03-24T23:31:39+5:302017-03-24T23:31:39+5:30
दोन महिला गंभीर : गोदरेज कंपनीत दुर्घटना
आवाशी : लोटे-परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत रासायनिक वायू गळतीची मालिका मागील सहा महिन्यांपासून सुरूच आहे. गुरुवारी रात्री येथील गोदरेज अॅग्रोवेट लिमिटेड या कंपनीत झालेल्या वायू गळतीत वसाहतीलगतच्या वस्तीतील ३९ जणांना वायूची बाधा झाली आहे. त्यामध्ये दोन महिलांची प्रकृती गंभीर आहे.
कंपनीतील दुसऱ्या पाळीत डिस्टेलेशनचे काम सुरू असताना रिअॅक्टरच्या काचेला तडा गेला व आतून वायू बाहेर पडून आसपास पसरला. त्याची गुणदे-तलपीवाडी येथील ३६ ग्रामस्थांसह कंपनीतील तीन कामगारांना वायूची बाधा झाली. कंपनीत हार्बोसाईड या तणनाशकाचे उत्पादन घेतले जाते. यासाठी ढोलवीन, एमएसबीडी, सोडियम क्लोराईड हा कच्चा माल वापरला जातो. गुरुवारी रात्री बाष्पीभवनाचे काम सुरू असताना
येलवीन वायूच्या रिअॅक्टरच्या काचेला अचानक तडा गेला व त्यातून गळती झाली. यावेळी कंपनीत २१ कामगार काम करीत होते.या वायूगळतीत कंपनीचे ठेकेदारी कामगार अक्षय घाग (सोनगाव), रवींद्र खळे व संकेत खसासे यांना वायूची बाधा झाली, तर तलारीवाडीतील मंदार संतोष खरात (वय ३१), शेहिमा बवा (४०), रुबी खातीम (४०), जनाबाई खरात (६५), देवकी खरात (६५), रंजना खरात (४५), अरुणा घाडगे (३७), धनश्री खरात (२१), हनुमंत चव्हाण (५५), विकी गुप्ता (१४), रुतिझा आखाडे (१०), श्रावणी आखाडे (३), यश आखाडे (६), रेश्मी आखाडे (२६), मंदा शेंडे (३५), मुन्ना अरविंद (२०), पांडुरंग खरात (५४), शशिकांत गाडगीळ (४३), नितीन बावधाने (३०), शैलेश आखाडे (१४), अक्षय फाकडे (११), रमेश आखाडे (४३), अश्विनी खरात (१८), प्रथम खरात (७), सिया खरात (५), बिनबल यादव (४५), अमित चव्हाण (२५), रहिमिय्या हुसैन (२७), सानिका वरळ (२५), सूरज पवार (२५) यांना वायूची बाधा झाली. यापैकी देवकीबाई सखाराम खरात (८०), मंदा शेंडे (३५) यांना अधिक उपचारांसाठी चिपळुणातील खासगी रुग्णालयात, तर इतरांना येथीलच परशुराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. चिपळूण येथील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या अपघातात संपूर्ण तलारीवाडीला वायूची बाधा झाल्याने येथील वस्तीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (वार्ताहर)