जिल्ह्यातील ३९ गावे पूरबाधित
By Admin | Published: May 14, 2015 10:17 PM2015-05-14T22:17:42+5:302015-05-14T23:59:20+5:30
प्रशासनाकडून निश्चिती : आपत्ती व्यवस्थापन निवारण विभाग सज्ज, नियंत्रण कक्ष स्थापन
गिरीश परब - सिंधुदुर्गनगरी -सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १० नदी व खाडीलगतची तब्बल ३९ गावे ही पूरबाधित म्हणून प्रशासनाने निश्चित केली आहेत. या गावांमधील ३२८ कुटुंबे व ४३४७ लोकांना पावसाळ्यात पुराचा फटका बसण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. त्यामुळे आगामी पावसाळी हंगामात या गावांना पुरापासून कोणताही धोका निर्माण होऊ नये तसेच धोका निर्माण झाल्यास या गावांना तत्काळ मदत मिळावी यासाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण विभाग सज्ज झाला आहे. आपत्तीचा सामना करण्यासाठी संपूर्ण बचाव साहित्य उपलब्ध असून आठही तालुक्यांमध्ये १ जून ते ३० आॅक्टोबर या कालावधीत २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.
राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा हा एकमेव असा जिल्हा आहे. तेथे पावसाळी हंगामात सरासरी ३८०० ते ४३०० मि. मी. पर्यंत सरासरी पाऊस पडतो. ज्याठिकाणी पाऊस जास्त त्याठिकाणी आपत्तीही तेवढ्याच प्रमाणात असते. परिणामी सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे दरवर्षी कोटीच्या घरात नुकसानी होत असते.
तसेच नदी व खाडीलगतच्या गावांमधील घरांमध्ये पुराचे पाणी शिरून घरांची पडझड, घरातील अन्नधान्य भिजणे, शैक्षणिक साहित्याचे नुकसान होणे, पुरात माणसे वाहून जाणे यासारखे प्रकारही घडत असतात. म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने दरवर्षी सर्व्हे करून (माहिती घेऊन) पूरबाधीत गावांना अलर्ट केले जाते.
यावर्षी प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील १० नदी व खाडीलगतची तब्बल ३९ गावे ही पूरबाधित (पूरप्रवण) क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. काही वर्षात त्याठिकाणी पूर येवून आपत्ती उद्भवल्याचा निकष लावून ही गावे निश्चित करण्यात आली आहेत. या गावांमध्ये विशेष लक्ष देण्यात येणार आहे. तसेच ‘त्या’ गावातील लोकांना दक्षतेच्या सूचनाही प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.
संभाव्य पूरबाधित गावे
१0 नदी खाड्यांमध्ये पुराचा धोका
जिल्ह्यात अतिवृष्टी झाली की प्रामुख्याने १० नदी व खाडीलगत असणाऱ्या गावांना पुराचा धोका संभवतो. या नदी व खाडीला पूर आला की त्याचे पाणी घरात शिरते. परिणामी काही ठिकाणी गावागावांमधील संपर्कदेखील तुटतो.
या नद्यांमध्ये गडनदी, होडावडा नदी, कालवी नदी, तुळस नदी, शांती नदी, सुखनदी, गोठणा नदी, तेरेखोल खाडी, गडकालावल खाडी, विजयदुर्ग खाडी या नदी व खाड्यांपासून प्रामुख्याने लगतच्या काही गावांना पुराचा धोका संभवतो.
प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार पूरप्रवण क्षेत्रामध्ये ३२८ कुटुंबे येत आहेत.
तसेच ४३४७ लोकांना पावसाळ्यात पुराचा फटका बसण्याची शक्यता असून त्याठिकाणी त्यांना प्रशासनाकडून दक्ष राहण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत. संबंधित कुटुंबांना पावसाळा कालावधीत दुसऱ्या ठिकाणी (पुराचा धोका नाही) राहण्याबाबत प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करणार
अद्ययावत व्यवस्थापन आराखडा करण्यात आला आहे. मान्सूनपूर्व करावयाच्या सर्व कामांची सूचना संबंधित विभागांना देऊन कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व त्यांचा समन्वय साधण्यासाठी जिल्हास्तरावरून सातत्याने मार्गदर्शन करण्यात येते. त्याचप्रमाणे नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग व जिल्हा परिषद या सर्व विभागांना आपत्कालीन कालावधीत घ्यावयाची खबरदारीबाबत मान्सूनपूर्व बैठकीत सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे सर्व विभाग आपत्ती कालावधीत व कालावधीपूर्व सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत.
- ज्ञानेश्वर खुटवड, निवासी उपजिल्हाधिकारी
आपत्ती उद्भवल्यास विभाग सज्ज
जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवली तरी सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग नेहमीच दक्ष असतो. शोध व बचाव साहित्य सामुग्री पुरेशी असून नवनवीन साहित्य खरेदी, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणे, जनजागृती यासाठी शासनाकडून लाखो रुपये निधी प्राप्त होत असून त्याचा योग्य विनियोग आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून होत आहे. त्यामुळे एखादी आपत्ती उद्भवली तरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग त्याला तोंड देण्यास नेहमीच सक्षम असतो. त्यादृष्टीने यावर्षी अगोदरच आपत्ती व्यवस्थापन करण्यात आले आहे.
लोकमत
विशेष