Sindhudurg: राजकोट येथील शिवपुतळा उभारणीत थ्रीडी तंत्रज्ञान, सतीश देसाई यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 11:49 AM2023-12-08T11:49:10+5:302023-12-08T12:00:29+5:30
जबाबदारी आणि आव्हानात्मक काम वेळेत पूर्ण
मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उभारणी कामात मालवणचे सुपुत्र आणि मुंबईतील डिझाइन थ्रीडी सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सतीश शांताराम देसाई यांचे महत्त्वपूर्ण तांत्रिक योगदान लाभले. शिल्पकार जयदीप आपटे यांनी घडविलेल्या शिवरायांच्या मूळ मूर्तीचे थ्रीडी स्कॅनिंग व डिजिटल क्लोन करून भव्य पुतळा उभारणीसाठी आवश्यक थ्रीडी प्रिंटसाठी थ्रीडी फाइल तयार करण्याची जबाबदारी सतीश देसाई यांनी यशस्वीरीत्या पाडत या पुतळ्याच्या उभारणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची सुरुवात ज्या भूमीतून झाली त्याच आपल्या मालवण या मायभूमीत नौदल दिनानिमित्त उभारलेल्या शिव पुतळ्याच्या निर्मितीत आपल्यालाही खारीचा वाटा उचलता आला हे माझे भाग्य आहे, अशी प्रतिक्रिया सतीश देसाई यांनी दिली. शिव पुतळ्याचे अनावरणप्रसंगी मालवणात दाखल झालेल्या सतीश देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधत या पुतळ्याच्या उभारणीतील आपल्या जबाबदारीविषयी माहिती दिली.
राजकोट येथे उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याची मूळ मूर्ती कल्याण येथील शिल्पकार जयदीप आपटे यांनी तयार केली आहे. ही मूळ मूर्ती मातीची ६ फूट उंचीची आहे. या मातीच्या मूर्तीवरून फायबर ग्लासची मूर्ती बनविण्यात आली. या मूर्तीच्या आधारे महाराजांची २५ फुटी भव्य मूर्ती बनविण्यासाठी थ्रीडी स्कॅनिंग व डिजिटल क्लोन या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज असून या कामाची जबाबदारी नौदलाकडून आपल्या डिझाइन थ्रीडी सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे सोपविण्यात आली.
मूर्तीची उंची २५ फुटांपर्यंत वाढविली
मुख्य पुतळा निर्माण करण्यासाठी आवश्यक थ्रीडी फाइल बनवून देण्याचे काम आपण पूर्ण केल्याचे सतीश देसाई म्हणाले. हे काम आपल्याकडे आल्यावर जयदीप आपटे यांच्या मूर्तीशाळेत जाऊन मूळ ६ फुटी मूर्तीचे सर्व बाजूने थ्रीडी स्कॅनिंग करण्यात आले. या स्कॅनिंगच्या आधारे शिवरायांच्या मूर्तीची थ्रीडी इमेज संगणकात तयार करण्यात आली. त्यामध्ये मूर्तीमधील महाराजांचा जिरेटोप ते पायापर्यंतच्या भागातील अनेक बारकावे सुस्पष्ट करीत, स्कॅनिंगमध्ये स्कॅन न झालेले भाग भरून काढत तसेच इतर आवश्यक गोष्टी समाविष्ट करून मूर्तीची उंची २५ फूटपर्यंत वाढविण्यात आली.
ब्रॉन्झ धातूमध्ये ६५० भाग
६५० भाग ब्रॉन्झ धातूमध्ये तसेच या पुतळ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धातूची जाडी किती असेल याचेही माप या इमेजमध्ये तयार करण्यात आले. अशाप्रकारे शिवरायांच्या पुतळ्याच्या अंतिम स्वरूपाची थ्रीडी फाइल तयार करून थ्रीडी प्रिंटिंग करणाऱ्या दुसऱ्या एका कंपनीकडे ही फाइल सोपविण्यात आली. या थ्रीडी फाइलचे मोठे प्रिंट काढून त्या आधारे पुतळ्याचे सुमारे ६५० भाग ब्रॉन्झ धातूमध्ये तयार करून ते मालवण राजकोट येथे पाठविण्यात आले. त्यानंतर राजकोट येथेच या भागाची वेल्डिंगद्वारे जोडणी करून व फिनिशिंग करून शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात आला, अशी माहिती सतीश देसाई यांनी दिली.