देवगडच्या हापूसचे 40 टक्के उत्पादन, हंगाम संपुष्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 03:21 PM2018-06-07T15:21:16+5:302018-06-07T15:21:16+5:30
देवगड हापूसचा यावर्षीचा हंगाम आता संपला असून यावर्षी सुमारे ४० टक्के हापूसचे पीक आल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात आले.
- अयोध्याप्रसाद गावकर
देवगड (सिंधुदुर्ग) : देवगड हापूसचा यावर्षीचा हंगाम आता संपला असून यावर्षी सुमारे ४० टक्के हापूसचे पीक आल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात आले. बागायतदारांनी शेवटच्या टप्प्यातील मे महिन्यातील आंबा हा वाशी मार्केटमध्ये कमी पाठवत पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, बेंगलोर या ठिकाणच्या मार्केटमध्ये तर काही बागायतदारांनी तेथे जाऊन स्वत: माल विकल्याने हापूस आंब्याला प्रति डझन ४०० रुपये भाव मिळाला. बागायतदारांनी स्वत:चा माल स्वत:च विकला तर वाशी मार्केटमधील कित्येक वर्षांपासून चाललेली दलालांची मक्तेदारी रोखली जावू शकते, हे यातून स्पष्ट होत आहे.
देवगड हापूसचे यावर्षीचे उत्पादन उत्कृष्ट नसले तरी समाधानकारक असल्याचे बागायतदारांतून बोलले जात आहे. यावर्षी हापूस आंब्याची तोडणी जानेवारी महिन्यापासून सुरू करण्यात आली. यामुळे जानेवारीच्या अखेरपासून देवगड हापूस वाशी मार्केटमध्ये थोड्याफार प्रमाणात दाखल होऊ लागला. मार्च महिन्यापर्यंत सुमारे १० टक्केच हापूस यावर्षीच्या एकूण उत्पादनापैकी वाशी मार्केटला दाखल झाला होता. तर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमी आंबा असल्याचे दिसून आले होते.
यामुळे एप्रिल महिन्याच्या १५ तारीखनंतर ते मे महिन्याच्या ७ तारीखपर्यंत १० टक्केच आंबा असल्याचे दिसून आले होते. यानंतर मे महिन्याच्या १० ते २५ तारीखपर्यंत यावर्षीच्या एकूण उत्पादनापैकी निम्मे आंबा पीक असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे मे महिन्यातील शेवटच्या टप्प्यात यावर्षीच्या एकूण उत्पादनापैकी २० टक्के आंबा असल्याने हा आंबा येथील बागायतदारांनी वाशी मार्केटमध्ये भाव उतरल्याने पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व अन्य बाजारपेठांमध्ये स्टॉल उभारुन विक्री केला आहे.
गतवर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीने देवगड व पडेल कॅन्टींग येथे आंबा कॅनिंग सेंटर उभारून त्या ठिकाणी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हमीभावाने ३० रुपये प्रतिकिलोने कॅनिंग आंबा घेतला होता. यामुळे सर्व तालुक्यातील कॅनिंग कंपन्यांना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रतिकिलो ३० रुपये दराने कॅनिंगचा आंबा घेण्यास भाग पडत होते. मात्र, यावर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीने गतवर्षासारखे आंबा कॅनिंगचे स्टॉल उभारले नसल्यामुळे याच संधीचा गैरफायदा घेऊन यावर्षी कॅनिंगचा आंबा घेणा-या कंपन्यांनी शेतक-यांची लुटमार केली आहे.
कवडीमोलाने आंबा कॅनिंगसाठी
यावर्षी १ मे च्या सुमारास कँनिंग कंपन्यांनी कॅनिंग आंबा घेण्यास प्रतिकिलो २८ रुपयांनी सुरवात केली होती. मात्र या कॅनिंग कंपन्यांवर यावर्षी कुणाचाही अंकुश नसल्याने या कंपन्यांनी ऐन हापूस आंब्याच्या हंगामात हळूहळू कॅनिंगचा भाव उतरवून १६ रुपये प्रतिकिलो भावाने आंबा घ्यायला सुरुवात केली. यामुळे कवडीमोलाने कॅनिंगचा आंबा कॅनिंग कंपन्यांना बागायतदारांना द्यावा लागत होता.
हापूस आंब्याची विक्री शेवटपर्यंत तीनशे ते चारशे रुपये प्रति डझन
पुणे येथील पणन विभागाच्या मार्केटमध्ये मे महिन्यात आग लागल्याने देवगड तालुक्यातील बागायतदारांनी उभारलेल्या स्टॉलचेदेखील नुकसान झाले होते. मात्र या प्रसंगाला गडबडून न जाता तेथील स्टॉलधारकांनी पुणे येथील रस्त्यावरील जागा मिळेल त्या ठिकाणी स्टॉल उभारुन त्या ठिकाणी आपल्या हापूस आंब्याची विक्री केली. शेवटपर्यंत तीनशे ते चारशे रुपये प्रतिडझन भावाने आंबा विकला असल्याचे बोलले जात आहे.
स्टॉल उभारून लाखो रुपयांची उलाढाल
वाशी मार्केटमध्ये मे महिन्यात ५ डझनच्या आंबा पेटीला हजार ते बाराशे रुपये भाव मिळत होता. मात्र, देवगड तसेच कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली आदी मोठ्या बाजारपेठांमध्ये अडीचशे, तीनशे ते चारशे रुपये प्रति डझन हापूस आंब्याला चांगल्याप्रकारे भाव मिळत होता. पुणे येथील पणन विभागाच्या जागेमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देवगड तालुक्यातील आंबा बागायतदारांनी आपले स्टॉल उभारले होते. तालुक्यातील सुमारे २२ बागायतदारांनी स्टॉल उभारून लाखो रुपयांची उलाढाल करून चांगल्याप्रकारे देवगड हापूसच्या आंबा पेटीची विक्री केल्याचे बोलले जात आहे.