पाणीटंचाईवरून जोरदार खडाजंगी, सावंतवाडीला ४६ कोटींची पाणी योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:25 PM2021-03-13T17:25:40+5:302021-03-13T17:30:25+5:30
Sawantwadi Sindhdurgnews- सावंतवाडी शहरात ऐन मार्च महिन्यात होणाऱ्या पाणीटंचाईवरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. मात्र नगराध्यक्ष संजू परब यांनी वेळीच यात हस्तक्षेप करत सावंतवाडी शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून, त्यासाठी ४६ कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगितले. मात्र शिवसेना सदस्यांनी नियमबाहय नळ कनेक्शन्स दिली आहेत का, याची चौकशी करण्यासाठी समिती नेमा अशी मागणी केली. त्याला नगराध्यक्षांनी मंजुरी दिली.
सावंतवाडी : सावंतवाडी शहरात ऐन मार्च महिन्यात होणाऱ्या पाणीटंचाईवरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. मात्र नगराध्यक्ष संजू परब यांनी वेळीच यात हस्तक्षेप करत सावंतवाडी शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून, त्यासाठी ४६ कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगितले. मात्र शिवसेना सदस्यांनी नियमबाहय नळ कनेक्शन्स दिली आहेत का, याची चौकशी करण्यासाठी समिती नेमा अशी मागणी केली. त्याला नगराध्यक्षांनी मंजुरी दिली.
सावंतवाडी नगरपालिकेची मासिक बैठक नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, राजू बेग, नासिर शेख, सुरेंद्र बांदेकर, डॉ. जयेंद्र परूळेकर, सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, नगरसेविका शुभांगी सुकी उपस्थित होते.
नगरपालिकेची मासिक बैठक सुरुवातीला खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
मात्र आयत्या वेळच्या विषयात नगरसेविका लोबो यांनी सावंतवाडीत जुनाबाजार, सालईवाडा, समाजमंदिर परिसरात ऐन मार्च महिन्यात पाणीटंचाई कशी भासते, असा सवाल करत या पाणीटंचाईमागे कोण आहे? तुम्हाला बदनाम करण्यासाठी ही पाणीटंचाई करण्यात आली आहे का? असा सवाल केला.
तसेच या पाणी टंचाईची चौकशी करण्याची मागणी केली. यावरून नगरसेवक नासिर शेख व सुधीर आडिवरेकर यांनी, तुमच्या काळापासून ही पाणीटंचाई आहे, मग तेव्हा गप्प का होता? असा सवाल करत, प्रत्येकवेळी चौकशीची मागणी करता, मग तुमच्या काळात काय केले? असा सवाल केला. तसेच लोबो व बांदेकर यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. पण त्याला शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रत्युत्तर दिले. यावरून शिवसेना व भाजपच्या नगरसेवकामध्ये चांगलीच खडाजंगी झाली.
नगराध्यक्षांनी सदस्यांना केले शांत
अखेर यामध्ये नगराध्यक्ष संजू परब यांनी सर्वच नगरसेवकांना शांत करत, मी स्वत: नगराध्यक्ष झाल्यापासून सावंतवाडीतील पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून नव्या नळपाणी योजनेसाठी पाठपुरावा करत होतो. त्याला जीवन प्राधिकरणने तांत्रिक मंजुरी दिली असून, ४० कोटी खर्चाची योजना तयार करण्यात येणार आहे. त्यात ६ कोटी रुपये सावंतवाडी नगरपालिका देणार असून, एकूण ही ४६ कोटीची योजना असणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगत सर्व सदस्यांना शांत केले, तर चराठे माजगाव ग्रामपंचायतींना नगरपालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्याला आणखी ९० दिवसांची मुदत वाढवून दिल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.