कुटुंबाला ५ लाख देणार

By admin | Published: October 5, 2015 09:53 PM2015-10-05T21:53:18+5:302015-10-06T00:42:17+5:30

तिलारीबाबत वनटाईम सेटलमेंट : रवींद्र सावळकर यांची माहिती

5 lakhs to the family | कुटुंबाला ५ लाख देणार

कुटुंबाला ५ लाख देणार

Next

सिंधुदुर्गनगरी : ९४७ तिलारी प्रकल्पग्रस्तांचे दाखले प्रशासनाकडे जमा करण्याची कार्यवाही सुरु असून एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त प्रकल्पग्रस्तांचे दाखले दिले असतील तर प्रतिकुटुंब ५ लाख रुपये देण्यासंदर्भात शासनाचे मार्गदर्शन मागविण्यात येणार आहे. त्यानुसार दाखल्यांची पडताळणी करूनच वनटाईम सेटलमेंटनुसार प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शरदचंद्र शिरोडकर, कणकवली अधीक्षक अभियंता प्रदीप सोरटे, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस निरीक्षक बाळासाहेब खोत, सहाय्यक माहिती अधिकारी संध्या गरवारे, अर्चना माने आदी उपस्थित होते.
९४७ तिलारी प्रकल्पग्रस्तांना नोकरीऐवजी वनटाईम सेटलमेंटनुसार प्रत्येक कुटुंब ५ लाख रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार या सर्व प्रकल्पग्रस्तांचे दाखले जिल्हा पुनर्वसन शाखेकडे जमा करण्याचे काम सुरु आहे. शासन निर्णयानुसार प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपये दिले जाणार आहेत. यापूर्वी पुनर्वसन दाखल्यांची पडताळणी होणार आहे. कारण एकाच कुटुंबातील दोघांना पुनर्वसन दाखला दिला असेल तर त्याला ५ लाख रुपये द्यावेत किंवा कसे याबाबत मार्गदर्शन मागितले जाणार आहे. जे दाखले योग्य आहेत त्यांना लाभ दिला जाणार आहे. कुणाही प्रकल्पग्रस्ताला अनुदानापासून वंचित ठेवण्याचा आमचा उद्देश नाही.
मात्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनांनुसार सर्व कार्यवाही करण्यात येणार आहे. गोवा शासनाकडून तिलारी प्रकल्पग्रस्तांना बँक खाते क्रमांक कळवा असे पत्र आमच्याकडे प्राप्त झाले आहेत. या सरकारकडून जिल्हा प्रशासनाकडे अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. आजपर्यंत ३५० प्रकल्पग्रस्तांचे दाखले पुनर्वसन विभागाकडे जमा करण्यात आले आहेत. उर्वरितांसाठी दोडामार्ग तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये कॅम्प घेऊन प्रकल्पग्रस्तांचे दाखले गोळा करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर यांनी दिली. सिंधुदुर्गनगरी प्राधीकरण क्षेत्रात ४० टक्के स्ट्रीटलाईट या बंदावस्थेत असल्यामुळे सर्वांचीच गैरसोय होत आहे. संबंधित ठेकेदार व महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना देऊन या स्ट्रीटलाईट चालू करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. (प्रतिनिधी)


वाळूला दिली मुदतवाढ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० वाळूपट्ट्यांमध्ये सुमारे ११ लाख ब्रास वाळू शिल्लक असून यापैकी प्रशासनाने १८ हजार ब्रास उत्खननास परवानगी दिली आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून वाळू उत्खननास मुदतवाढ देण्यात आली असून प्रशासनाकडून वाळू उत्खननासाठी प्रस्ताव करावे असे आवाहनही करण्यात आले आहे. या वाळूपट्ट्यांचे मेरीटाईम बोर्डाकडून पुन्हा सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे अशी माहिती खुटवड यांनी दिली. लोकशाही दिनात तीन तक्रार अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी एक अर्ज जागेवरच निकाली काढण्यात आला आहे. उर्वरीत दोन पुढील कार्यवाहीसाठी पाठविले आहेत.


आरोग्यावर परिणाम होत असल्याची तक्रार
दोडामार्ग तालुक्यातील भेडशी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गोंगाटामुळे माझ्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार तेथील रविंद्र आत्माराम मणेरीकर यांनी लोकशाही दिनात केली आहे. तक्रारीत त्यांनी असे म्हटले आहे की, माझ्या घरापासून शाळा ७० फुटाच्या अंतरावर आहे. विद्यार्थ्यांवर मुख्याध्यापकांचे नियंत्रण नसल्याने विद्यार्थ्यांचा गोंगाट फार असतो. त्यामुळे माझ्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे या प्रकरणी शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर यांना चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर यांनी दिली.
चौपदरीकरण, घरांचे मूल्यांकन सुरु
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठीच्या लागणाऱ्या जमिनींचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. खारेपाटण ते पत्रादेवी या दरम्यान नकाशावरती येणाऱ्या घरे, झाडे यांच्या मूल्यांकनाचे काम सुरु आहे. घरांची किंमत, झाडांची प्रकारानुसार किंमत किती आहे याचे मूल्यांकन करण्यात येणार आहे.

Web Title: 5 lakhs to the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.