सिंधुदुर्गातील ५ हजार शेतकऱ्यांना मोफत भरड धान्य वाटप करणार, अतुल काळसेकर यांची माहिती
By सुधीर राणे | Published: June 22, 2023 05:01 PM2023-06-22T17:01:14+5:302023-06-22T17:01:34+5:30
प्रोत्साहन अनुदान, खावटी कर्जमाफी लवकरच मिळणार
कणकवली: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. आपल्या जीवनात भरड धान्याचे फार महत्व आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना मोफत भरड धान्य वाटप करण्यात येणार आहे. भरड धान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याची माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत,मनोज रावराणे, स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघाचे हेमंत सावंत, संदीप राणे, पंकज दळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अतुल काळसेकर म्हणाले, सध्या पाऊस लांबणीवर पडला असल्याने भाताची दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे भरड धान्य या शेतकऱ्यांना नुकसानी पासून वाचवू शकेल. त्यासाठी नाचणी १५०० किलो, वरी १५०० किलो, सावा, कांग, हरिक, बरड, ब्राऊन टॉप ५०० किलो असे बियाणे मोफत वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यात आता अडीच लाख किलो हळद बियाणे उपलब्ध झाले आहे. कारण आम्ही आत्मनिर्भर उपक्रमांतर्गत अनेकांना हळद बियाणे वाटप केले होते. तशाच प्रकारे भरड धान्य बँक तयार व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
प्रोत्साहन अनुदान, खावटी कर्जमाफी लवकरच मिळेल !
यादीत नाव येऊनही अद्यापही प्रोत्साहन अनुदान जमा न झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच ते अनुदान मिळेल. तसेच खावटी कर्ज माफी संदर्भात आमचा पाठपुरावा पालकमंत्री रवींद्र चव्हाण व सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सुरु असल्याची माहिती अतुल काळसेकर यांनी दिली.