५0 हजार लिटर दुधाची आवक जिल्ह्यातील स्थिती : अपुरे उत्पादन
By admin | Published: August 31, 2014 10:01 PM2014-08-31T22:01:21+5:302014-08-31T23:29:17+5:30
शासकीय दूध विक्री ठप्प
कणकवली : गणेशोत्सवासाठी हजारो लोकांचे आगमन जिल्ह्यात होते. या काळात दुधाची वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात पुरेसे दुग्धोत्पादन होत नसल्याने जिल्ह्याबाहेरून दुधाची आवक होत आहे. सुमारे ५० हजार लिटर दूध गणेशोत्सवात जिल्ह्याबाहेरून आणले जात आहे.
जिल्ह्यात शेतकरी कुटुंबात गुरेढोरे पाळली जातात. गाई-म्हैशी पाळणाऱ्या शेतकऱ्यांकडून कुटुंबाची आणि ठराविक कुटुंबांची गरज भागवली जाते. प्रती जनावर दुग्धोत्पादनही खूप कमी होते. दुग्धोत्पादनाला जिल्ह्यात उर्जितावस्था आलेली नाही. चाऱ्याची टंचाई, व्यापारी तत्त्वावर दूध उत्पादन करण्याची मानसिकता नसणे, दूध संकलनाच्या साखळीतील त्रुटी आदी कारणांमुळे जिल्ह्याबाहेरील दुधावर जिल्हावासीयांना अवलंबून रहावे लागते. जिल्ह्यातील घरगुती दूध उत्पादन सुमारे २० हजार लिटरच्या घरात आहे. जिल्ह्याची गरज भागविण्यासाठी या व्यतिरिक्त रोज जिल्ह्याबाहेरून ३० ते ४० हजार लिटर दूध येते. सध्या गणेशोत्सव सुरु आहे. गणेशोत्सवात मुंबई तसेच अन्य भागातून हजारो चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यामुळे गणेशोत्सवात अतिरिक्त दुधाची मागणी लक्षात घेता या व्यतिरिक्त सुमारे ५० हजार लिटर दूध मागवले जाते. शासकीय दूधविक्री बंद झाल्याने ग्राहकांना हा फटका बसत आहे. ‘आरे’ दूधविक्री सुरू ठेवण्यासाठी शासनाकडूनही प्रयत्न झालेले नाहीत. संकलन बंद झाले तरी ग्राहकांना स्वस्त दूध मिळण्यासाठी इतर ठिकाणावरून दूध आणून शासकीय दूध डेअरीत प्रक्रिया आणि पॅकिंग करून दूध विकणे शासनाला शक्य होते. गोकुळ दूध संघही जिल्ह्यातील दूध एकत्रित करून कोल्हापूर येथे पॅकिंगसाठी घेऊन जातो. यापूर्वी जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ स्थापन करून ‘मोरणा’ ब्रॅँडने दूध विक्रीचा प्रयत्न झाला. तीन वर्षे चालल्यानंतर तोट्यात गेल्याने हा प्रकल्प बंद करण्यात आला. महानंदचा कुडाळ येथील प्रकल्प बंद झाल्याने आता गोव्यातून दूध पॅकिंग करून जिल्ह्यात आणून विकले जाते. (प्रतिनिधी)
शासकीय दूध विक्री ठप्प
वागदे येथील शासकीय दूध संकलन केंद्राद्वारे दूध विक्री पूर्णत: ठप्प झाली आहे. येथील दूध संकलन केंद्राद्वारे दुधावर प्रक्रिया करून ते विक्री केले जात होते. ‘आरे’ ब्रॅँडचे हे दूध इतर खासगी दुधापेक्षा दहा-बारा रूपये स्वस्त पडत होते. सध्या खासगी कंपन्यांचे दूध ५० ते ६० रूपये लिटर झाले आहे. विक्रेते ‘फ्रिजींग चार्ज’ म्हणून एक-दोन रूपये उकळतात ते वेगळे.