‘रत्नागिरी गॅस’मधून आता ५०० मेगावॅट वीजनिर्मिती
By admin | Published: January 23, 2016 11:49 PM2016-01-23T23:49:42+5:302016-01-23T23:49:42+5:30
रेल्वेकडून वीज खरेदी : झारखंड, पश्चिम बंगाललाही वीजपुरवठा
गुहागर : रत्नागिरी गॅस प्रकल्पातून गेले दोन महिने ३०० मेगावॅट वीजनिर्मिती सातत्याने सुरू आहे. त्यानंतर आता झारखंड व पश्चिम बंगालला वीज पाठविण्यासंदर्भातील नियमांची पूर्तता रेल्वेने केली आहे. त्यामुळे २२ जानेवारीला सायंकाळी ६ वाजल्यांपासून वीजनिर्मितीत २०० मेगावॅटची वाढ होऊन आता ५०० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू झाली आहे. तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रत्नागिरी गॅस प्रकल्पातून २६ नोव्हेंबरला वीजनिर्मिती सुरू झाली. २१५० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता असलेला हा प्रकल्प कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात होता. महाराष्ट्रातील भारनियमनाचे संकट दूर करण्यासाठी बंद प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. अनेक संकटांवर मात करून प्रकल्पातून सरासरी एक हजार मेगावॅट वीजनिर्मिती होत होती. रिलायन्सकडून होणाऱ्या गॅसपुरवठ्यावर तयार होणारी महागडी वीज घेण्यास कोणीही तयार नसल्याने डिसेंबर २०१३ पासून प्रकल्पातील वीजनिर्मिती पूर्णपणे बंद होती.
केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी पहिल्यांदा प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरूकरणार, अशी घोषणा केली आणि त्यानंतर प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. ५०० मेगावॅट वीजनिर्मिती खरेदीला रेल्वेकडून हिरवा कंदील मिळाला. यासाठी दिल्ली येथील विशेष समितीने प्रकल्पाला भेट दिली.
रत्नागिरी गॅस प्रकल्पातून वीज घेण्यास सेंट्रल इलेक्ट्रिकल रेग्युलेटरी अॅथॉरिटी (सीईआरए) परवाना मिळाल्यानंतर महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनची नोव्हेंबरमध्ये मंजुरी मिळाली. यानंतर महाराष्ट्र रेल्वेसाठी ३०० मेगावॅट वीजनिर्मिती टप्पा-३ मधून सुरू करण्यात आली. झारखंड व पश्चिम बंगालला वीज पाठविण्यासाठी रेल्वेला परवाना मिळणे आवश्यक असल्याने गेले दोन महिने या तांत्रिक मंजुरी मिळविण्यात गेले.
याबाबत रत्नागिरी गॅस प्रकल्पाकडे आदेश प्राप्त झाल्यानंतर २२ जानेवारीला सायंकाळी ६ वाजल्यांपासून टप्पा-२ (बी)मधून २०० मेगावॅट वीजनिर्मितीला सुरुवात झाली. आता या प्रकल्पातून ५०० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे.