चौपदरीकरणासाठी ५ हजार कोटी
By admin | Published: May 4, 2015 12:37 AM2015-05-04T00:37:54+5:302015-05-04T00:38:53+5:30
विनायक राऊत यांचा विश्वास
अडरे : केंद्र शासनाने मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ५ हजार कोटीची तरतूद केल्यामुळे हा महामार्ग कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने राज्यमार्ग बनेल, असा विश्वास रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
चिपळूण शहरातील मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या वाशिष्ठी नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन खासदार राऊत यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार बाळ माने, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, कळंबस्तेचे सरपंच अरुण भुवड, उपसरपंच भाऊ मोरे, तालुकाप्रमुख सुधीर शिंदे, महिला व बालकल्याण सभापती प्रज्ञा धनावडे, महिला जिल्हा संघटक दर्शना महाडिक, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले की, केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून कोकणवासीयांचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होत आहे. त्यामुळे कोकणातील रस्ते विकासाला चालना मिळणार आहे. चौपदरीकरणाबाबत काही अडचणी आल्यास त्या आम्हाला सांगा, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री गीते म्हणाले की, केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यातून रस्ते विकासाचा धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. स्वातंत्र्यानंतर हा पहिला जाहीर कार्यक्रम आहे. ३ लाख कोटीचा निधी रस्ते विकासासाठी खर्च होणार आहे. रस्ते काँक्रीटीकरण केले जाणार आहेत. बहादूरशेख नाका ते पाग नाका या दरम्यान उड्डाण पूल व्हावा, अशी शहरवासीयांची मागणी असून, चार महिन्यांपूर्वीच याबाबतचा निर्णय आपण घेतला असल्याचे गीते यांनी स्पष्ट केले. कोकण रेल्वेला जसे सहकार्य केले त्याचप्रमाणे रस्ता चौपदरीकरणासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)