उच्च दाब वीज वितरण प्रणालीसाठी 5000 कोटींची गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 01:44 PM2018-11-20T13:44:14+5:302018-11-20T13:44:30+5:30
गेल्या चार वर्षाच्या काळात राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ चांगले काम करीत आहे.
कणकवली : गेल्या चार वर्षाच्या काळात राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ चांगले काम करीत आहे. या मंडळासमोर अनेक आव्हाने आहेत. तरीही सन 2014 पासून आतापर्यंतच्या कालावधीत वीज निर्मिती क्षमतेमध्ये 3300 मेगावॅटची वाढ झालेली आहे. तसेच राज्य भारनियमन मुक्त झालेले आहे. सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित केली जात आहे. तसेच उच्च दाब विज वितरण प्रणाली (एचव्हीडीएस )यासाठी 5000 कोटींची गुंतवणूक शासन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महावितरणचे कोकण विभाग प्रादेशिक संचालक श्रीकांत जलतरे , कोकण परिमंडळ मुख्यअभियंता रंजना पगारे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील अशोक शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी विश्वास पाठक म्हणाले, राज्यात 25000 मेगावॅटपर्यंत विजेची मागणी पोहोचली आहे. राज्यात वितरण व पारेषण यंत्रणेचे गेल्या तीन वर्षांपासून विविध योजनांच्या माध्यमातून सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येत आहे. कोणत्याही तांत्रिक बिघाडाशिवाय महावितरणने 20630 मेगावॅट विजेचा पुरवठा केला तर महापारेषणने 24012 मेगावॅट वीज पारेषित केली.
सन 2014 मध्ये सु्मारे 35 लाख कृषिपंप धारक वीज ग्राहक होते. त्यात आता वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2014 पासून ऑगस्ट 2018 पर्यंत 4 लाख 34 हजार 304 कृषिपंप वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. कृषिपंपांना यापुढे उच्च दाब विज वितरण प्रणाली द्वारे वीज जोडणी देण्यासाठी नवीन योजना मे 2018 मध्ये जाहिर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मार्च 2018 पर्यंत 2.5 लाख कृषिपंपाना वीज जोडणी देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित सुधारणार असून उत्पादकता वाढेल. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरू करण्यात आली असून, स्थानिक पातळीवर सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे कृषि फीडर द्वारे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत विज पुरवठा करण्यात येणार आहे. राळेगण सिध्दी व कोळंबी याठिकाणी प्रकल्प सुरु झाले आहेत. अन्य ठिकाणीही प्रकल्प सुरु होणार आहेत.