Sindhudurg: 'आंबा बागायतदारांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी'
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 14, 2024 05:49 PM2024-06-14T17:49:25+5:302024-06-14T17:49:42+5:30
आंबा, काजू उत्पादक बागायतदार संघाच्या वेंगुर्ला येथील बैठकीत मागणी
वेंगुर्ला : सततच्या अतिउष्णतेमुळे आंबा फळांवर मोठ्या प्रमाणावर चट्टे आल्याने अशा फळांची विक्री होऊ शकली नाही. थ्रीप्स रोग व फळमाशीच्या प्रादुर्भावामुळेही आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. परिणामी यावर्षी केवळ ३५ ते ४० टक्के उत्पादन आंबा उत्पादकांना मिळाले. त्यामुळे आंबा बागायतदारांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी आंबा व काजू उत्पादक बागायतदार संघाच्या बैठकीत करण्यात आली.
वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात आंबा काजू बागायतदार संघाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक झाली. यावेळी संघाचे सचिव ॲड. प्रकाश बोवलेकर, पदाधिकारी किशोर नरसुले, शिवराम आरोलकर, सदानंद पेडणेकर, रत्नदीप धुरी, सुरेश धुरी, स्वप्नील शिरोडकर, सदाशिव आळवे व यशवंत उर्फ आबा मठकर उपस्थित होते.
यावर्षी आंबा बागायतदारांना फळमाशीचा त्रास मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागला. प्रादेशिक फळ संशोधन केंद्राने सूचविलेल्या रक्षक सापळ्यांनाही आता ही फळमाशी दाद देत नाही. फळमाशी फळांना डंख करून ते फळ प्रदूषित करते. फळमाशीने डंख केलेले फळ डागाळत असल्याने ते विक्रीसाठी योग्य नसते. प्रादेशिक फळ संशोधन केंद्रांने यावर कायमस्वरूपी उपाय शोधावा, अशी मागणी बागायतदारांनी केली. आभार शिवराम आरोलकर यांनी मानले.
वन्यप्राण्यांवर हल्ल्याची शक्यता
शेकरूसोबत वेंगुर्ल्यासारख्या भागात आता लाल तोंडाची माकडे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. दोन्ही प्राणी नारळ व काजू पिकांचे अतोनात नुकसान करत आहेत. मोठ्या मेहनतीने तयार केलेले उत्पादन निसर्गाच्या लहरीपणाबरोबरच आता जंगली प्राण्यांमुळेही धोक्यात आले आहे. याकडे शासनाने आता तरी गांभीर्याने पाहावे. अन्यथा, आतापर्यंत शांत असलेल्या शेतकऱ्यांकडून संतापाच्या भरात या वन्य प्राण्यांवर हल्ला होण्याची शक्यता आहे.
बागायदारांनी फळबागा रोगमुक्त कराव्यात
वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे रोग शास्त्रज्ज्ञ डॉ. यशवंत गोवेकर व कनिष्ठ कीटक शास्त्रज्ज्ञ डॉ. वैशाली झोटे यांनी फळमाशी व अन्य रोगांच्या नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले. रक्षक सापळा परिसरातील सर्व बागांमध्ये लावला गेला तरच फळमाशीवर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. सर्व बागायतदारांनी रक्षक सापळ्याचा उपयोग करावा, रोटा व अन्य कीड रोगांच्या नियंत्रणासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात असलेली औषधे परिणामकारक आहेत. बागायतदारांनी आमच्याशी संपर्क साधून आपल्या बागा रोगमुक्त कराव्यात, असे आवाहन डॉ. गोवेकर यांनी बैठकीत केले.