सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३६० प्राथमिक शाळांमध्ये ५१,५४६ विद्यार्थी दाखल, १५ जूनपासून शाळा सुरू होणार 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 14, 2024 05:53 PM2024-06-14T17:53:39+5:302024-06-14T17:54:37+5:30

पाठ्यपुस्तक वितरणही पहिल्या दिवशीच होणार

51,546 students enrolled in 1360 primary schools in Sindhudurg, schools will start from June 15 | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३६० प्राथमिक शाळांमध्ये ५१,५४६ विद्यार्थी दाखल, १५ जूनपासून शाळा सुरू होणार 

संग्रहित छाया

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची किलबिलाट शनिवार, दि. १५ जूनपासून सुरू होत आहे. या जिल्हा परिषदेच्या १३६० प्राथमिक शाळांमध्ये पहिली ते सातवीपर्यंत मध्ये ५१,५४६ विद्यार्थी दाखल झाले आहेत. या सर्वच विद्यार्थ्यांचे स्वागत व शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मिरवणुकीद्वारे होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुख अधिकाऱ्यांना तसेच तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांना पहिल्याच दिवशी शाळा भेटीचे नियोजन दिले आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील हा शाळा प्रवेशाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या स्वागताने आनंदोत्सवात साजरा व्हावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांनी केले आहे.

१५ जून रोजी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १३६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात येणार असून, यानिमित्त प्रभात फेरी, नवागतांचे स्वागत शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी, पालक, निमंत्रित व व्यक्ती, नवागत विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी एकत्रित येऊन मिरवणूक काढणे, इयत्ता पहिली व इतर वर्गामध्ये प्रवेश घेणाऱ्या नव्या विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले जाणार आहे. याचवेळी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण- इयत्ता १ली ते ८वीच्या ५१ हजार ५४६ विद्यार्थ्यांना ५८ हजार ७२४ पाठ्यपुस्तक संचाचे वितरण शाळेच्या पहिल्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख व तालुकास्तरावरील सर्व अधिकारी सहभागी होऊन विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करून प्रेरणा देणार आहेत, यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी सर्व खातेप्रमुखांना आदेशित केले आहे. शाळा प्रवेशोत्सवासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, प्रतिष्ठित मान्यवर आणि इतर शिक्षणप्रेमी नागरिक उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांनी केले आहे.

पाठ्यपुस्तके तालुकानिहाय वितरण

सावंतवाडी तालुक्यात ११०१६ पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहेत. मालवण ६१६९ पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहेत. कणकवली १०३२३, कुडाळ ११७९७, देवगड मध्ये ८८३०, वेंगुर्ले ४९८८, वैभववाडी ३००४, दोडामार्ग २५९७, अशी एकूण मिळून ५८ हजार ७२४ एवढी पाठ्यपुस्तके संच तालुकानिहाय वितरित करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळणार आहेत, असेही प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी जाहीर केले आहे.

Web Title: 51,546 students enrolled in 1360 primary schools in Sindhudurg, schools will start from June 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.