संकष्ट चतुर्थीला ५४२१ मोदकांचा नैवेद्य
By admin | Published: September 20, 2016 11:39 PM2016-09-20T23:39:18+5:302016-09-20T23:47:16+5:30
२१ दिवसांचा गणेशोत्सव : सावंतवाडीतील हनुमान मंदिरातील उपक्रम
सावंतवाडी : वैश्यवाडा-सावंतवाडी येथील श्री देव हनुमान मंदिरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सुरू आहे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सोमवारी गणरायांना सुमारे ५४२१ मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.
२१ दिवसांचा गणेशोत्सव असलेल्या या उत्सवात रोज भजनादी कार्यक्रम सुरू असून, ते धोंडी दळवी, अॅड. परिमल नाईक, प्रकाश मिशाळ, शरद सुकी, वैश्यवाडा महिला मंडळ, प्रकाश सुकी, नीलेश नार्वेकर, म्हापसेकर बंधू, महादेव गावडे यांच्याकडून होत आहे. पुंडलिक दळवी, डॉ. गोविंद केसरकर यांच्या सहकार्यातून दररोजचे कार्यक्रम होत आहेत.
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पहाटे येथील वेदपाठशाळेचे प्राचार्य दीक्षित गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम झाला. यात बहुसंख्य महिला, नागरिक सहभागी झाले होते. त्यानंतर दुपारी महाआरती व सहस्त्र मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. २५ सप्टेंबरला भव्यदिव्य अशा विसर्जन मिरवणुकीने या उत्सवाची सांगता होणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी हलते देखावे, ढोलपथक, फुगडी नृत्य तसेच वैश्यवाडा भागातील कलाकारांच्या विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या गणेशोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन हनुमान मंदिर उत्सव समितीचे अध्यक्ष शरद सुकी यांनी केले आहे. (वार्ताहर)